spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी नगर परिषदचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी, येरखेडा नगर पंचायत अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव

कामठी :- राज्यातील आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालय, मुंबई येथे आरक्षण सोडतीची घोषणा करण्यात आली. या सोडतीनुसार कामठी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे, तर येरखेडा नगर पंचायतचे अध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जाहीर झाले आहे.

या निर्णयामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असले तरी राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीत मागील वेळी १६ प्रभाग होते. मात्र, यंदा एक प्रभाग वाढवून एकूण १७ प्रभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य अशी व्यवस्था राहणार असून, त्यामुळे एकूण ३४ सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे. या सदस्यपदांच्या आरक्षणासाठी सोडत येत्या बुधवारी (ता. ८ ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता कामठी नगर परिषद कार्यालयात काढण्यात येणार आहे.

सोडत जाहीर होताच इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून, कामठीतील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत या वेळी प्रभागवाढीमुळे काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नुकतीच नगर पंचायत दर्जा मिळालेल्या येरखेडा येथेही निवडणूक रंगणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या या नगर पंचायत निवडणुकीसाठी अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. येरखेडा येथे आज मंगळवार (ता. ७ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेदहा वाजता १७ सदस्यपदांसाठी आरक्षण सोडत होणार आहे.

येरखेडा ग्राम पंचायतला काही महिन्यांपूर्वी नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर स्थानिक राजकारणात नवी उमेद निर्माण झाली आहे. ग्राम पंचायत काळात प्रत्येक निवडणुकीत रंगतदार स्पर्धा पाहायला मिळायची, आता नगर पंचायत दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मतदार आणि संभाव्य उमेदवार दोघांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

कामठी व येरखेडा या दोन्ही ठिकाणच्या आरक्षण सोडतीनंतर स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांचा खेळ रंगणार असून, येत्या काही दिवसांत उमेदवारी आणि प्रचाराची लगबग वाढणार हे निश्चित आहे.

Popular Articles