अमरावती २० : मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा खुर्द गावाजवळील जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव प्रवीण सुखराम बेलसरे (वय १७, रा. कुलंगणा खुर्द) असे आहे. त्याच्यासोबत असलेला गोविंद गोपाळ कासदेकर (वय १७) मात्र या हल्ल्यातून थोडक्यात बचावला.
महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते
प्रवीण व गोविंद हे दोघेही सोमवारी गुरे चराईसाठी जंगलात गेले होते. गुरे आपल्या नातेवाईकांकडे मोझरी येथे सोडल्यानंतर, श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने त्यांनी डोंगरावर असलेल्या महादेव मंदिरात दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. दर्शनानंतर परतीच्या मार्गावर संध्याकाळी अचानक जोरदार पावसामुळे नदीच्या काठावर पाण्याची पातळी वाढली. रात्री अंधार झाल्याने ते काही वेळ तिथे थांबले. पाणी ओसरण्यानंतर दोघे गावाकडे निघाले असताना, जंगलातून अचानक आलेल्या वाघाने प्रवीणवर मागून हल्ला चढवला.
साथीदाराने शेतात लपून जीव वाचवला
प्रवीणवर वाघाने हल्ला केल्याचे पाहून घाबरलेल्या गोविंदने तेथून पळ काढला. तो रात्रभर एका शेतात लपून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावात परत आला आणि सर्व घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता प्रवीणचा मृतदेह जंगलात आढळून आला. त्याचा एक पाय तुटलेला होता आणि मृत्यू अत्यंत क्रूर पद्धतीने झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोविंदने सांगितला घटनाक्रम
“गुरे चारल्यानंतर आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी गेलो होतो. परतताना वाघाने अचानक हल्ला केला. मी घाबरून पळालो. माझ्या मित्राला वाचवणे अशक्य होते. त्यामुळे माझा जीव वाचवण्यासाठी पळून जाणे मला योग्य वाटले,” असे गोविंदने सांगितले.
मेळघाटात वाघाच्या हल्ल्यांमध्ये वाढ
मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून वाघांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यापूर्वीही जून महिन्यात हरीसाल वनपरिक्षेत्रात इंधनासाठी जंगलात गेलेल्या ५५ वर्षीय आदिवासी व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले होते.
वन विभागाकडून पुढील कारवाई
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे आणि गस्त पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक गावकऱ्यांना जंगलात जाण्याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








