सावनेर ८ – शहरातील हिंदी भाषिक वसाहतीमधील झेंडा चौक परिसरातील पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर प्रांगणात १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पारंपरिक भुजलीया उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. लोधी, कीराड, काछी, छीपा, रंगारी, ठाकूर, ब्राह्मण आदी हिंदी भाषिक समाज बांधव या उत्सवाच्या तयारीत उत्साहाने सहभागी झाले आहेत.
हिंदी श्रावण मासाच्या समाप्तीनंतर व रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा हा उत्सव मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, मालवा, महाकौशल आणि इतर हिंदी भाषिक भागांत मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून घरोघरी लावलेल्या भुजलीया घेऊन वाद्यवृंदासह मुख्य चौकात एकत्र येऊन नंतर नदीकाठी जाऊन विधिपूर्वक पूजन केले जाते. त्यानंतर महिलांचे दोन गट तयार होऊन पारंपरिक लोकगीतांच्या तालावर परस्पर सौहार्द आणि आनंद व्यक्त करत भुजलीया खेळतात. या माध्यमातून परस्पर मनोमालिन्य दूर करून आपुलकीची भावना वृद्धिंगत केली जाते.
भुजलीया उत्सवाचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्येही आढळतो. आल्हा ग्रंथानुसार, आल्हा-उदल यांची बहीण चंदा विवाहानंतर जेव्हा पहिल्या श्रावणात माहेरी येते, तेव्हा तिच्या स्वागतासाठी गावकरी भुजलीया उत्सव साजरा करतात, असा उल्लेख आढळतो. तसेच, घरी लावलेल्या भुजलीयांचे स्वरूप पाहून शेतातील पीकपेरणीचे अनुमानही बांधले जाते.
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी भुजलीया उत्सव समितीच्या वतीने सर्व समाजबांधव, महिला, युवक आणि युवती यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. उत्सव मार्ग व परिसर रंगोळी, तोरण, पताका आदींनी सजवण्याचे आवाहन समितीने केले आहे.








