– पाच कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण; तीन शाळांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा
संदीप कांबळे,कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीतील नगरपालिका शाळांच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी प्रशासनाने विविध विकासकामांचा प्रस्ताव पुढे आणला आहे. सहा शाळांमधील बांधकाम, दुरुस्ती, शौचालय, सौंदर्यीकरण, पेव्हर ब्लॉक, फरशी तसेच टाइल्स व ग्रॅनाईट फ्लोरिंगसह विविध कामांसाठी तब्बल ४ कोटी १४ लाख १८ हजार ९८० रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे. उपलब्ध प्रशासकीय नोंदीनुसार, काही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेशाची कार्यवाही सुरू आहे, तर काही प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रभाग क्रमांक ९ मधील न. प. इस्माईलपूरा उर्दू बॉईज शाळेसाठी १ कोटी २७ लाख ३८ हजार ६४४ रुपये खर्चाचे काम प्रस्तावित आहे. तळ व प्रथम मजल्याचे बांधकाम, शौचालय, स्वयंपाकघर, सौंदर्यीकरण व दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक, सुरक्षित बांधकाम तसेच सर्व खोल्यांमध्ये टाइल्स व ग्रॅनाईट फ्लोरिंग करण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्राप्त झाली असून कार्यादेश व करारनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
प्रभाग क्रमांक १६ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. उर्दू उच्च प्राथमिक शाळेसाठी ९७ लाख ५ हजार ३०६ रुपये खर्च प्रस्तावित आहे. शौचालय, सौंदर्यीकरण व दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक, सुरक्षित बांधकाम तसेच खोल्यांमध्ये टाइल्स व ग्रॅनाईट फ्लोरिंगची कामे केली जाणार आहेत. या कामाचीही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
प्रभाग क्रमांक १४ मधील स्व. चौधरी दयालसिंग यादव न. प. मराठी प्राथमिक शाळेसाठी ४४ लाख ९३ हजार ३८५ रुपये खर्चाचे काम प्रस्तावित आहे. शेड, शौचालय, स्टोअर रूम, सौंदर्यीकरण व दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक तसेच टाइल्स व ग्रॅनाईट फ्लोरिंगचा त्यात समावेश आहे. या कामाची निविदा प्राप्त झाली असून कार्यादेशाची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ८ मधील वारिसपुरा न. प. वारिसपुरा उर्दू कन्या शाळेसाठी ६८ लाख ४९ हजार १५६ रुपये खर्चाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. तळ व प्रथम मजल्याचे बांधकाम, शौचालय, सौंदर्यीकरण व दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक तसेच टाइल्स व ग्रॅनाईट फ्लोरिंग करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक १५ मधील न. प. पुरुषार्थी शाळेसाठी २५ लाख २० हजार ९८१ रुपये खर्चाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व दुरुस्तीचे काम प्रस्तावित आहे. या कामाचा प्रस्तावही प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
तर प्रभाग क्रमांक ५ मधील लाला ओली परिसरातील न. प. तिलकधारी हिंदी प्राथमिक शाळेच्या नूतनीकरणासाठी ५१ लाख ११ हजार ५०८ रुपये खर्च प्रस्तावित आहे. या कामाच्या प्रस्तावालाही प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे.
निधीची तरतूद झाली; आता प्रत्यक्ष कामाला वेग कधी?
नगर परिषदेकडून शाळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्रस्तावित करण्यात आला असला, तरी प्रशासकीय मंजुरी, कार्यादेश आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाची कार्यक्षमता महत्त्वाची ठरणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांना विलंब न करता कार्यादेश देणे आणि प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. शाळांच्या विकासासाठी निधीची तरतूद कागदावर न राहता प्रत्यक्ष बांधकामात दिसणे, हीच आता पालक, विद्यार्थी आणि नागरिकांची अपेक्षा आहे.





