spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर पोलिसांची अवैध रेती माफियांवर मोठी कारवाई; २ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

– आंधळगाव पोलिसांत ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; ५ टिप्परसह रेतीचा साठा पकडला

हंसराज, प्रतिनिधी भंडारा तुमसर :- तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने अवैध रेती वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आंधळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत ५ टिप्पर आणि मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असा एकूण २ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस हवालदार लिल्हारे हे आपल्या स्टाफसह गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही टिप्पर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही/महेकेपार येथील वैनगंगा मायनिंग वर्क्सच्या घाटातून विनापरवाना चोरीची रेती घेऊन येत आहेत. ही रेती मौजा कांद्री येथील परमेश नलगोपुलवार याच्या रिकाम्या प्लॉटमध्ये विल्हेवाट लावण्यासाठी साठवून ठेवली जात आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी कांद्री येथे छापा टाकला असता, तिथे अवैध रेतीचा साठा आणि वाहतूक करणारे टिप्पर आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:

दुर्गेश तिलकचंद कुरील (चालक, रा. कामठी), धर्मेंद्र जगदीश वर्मा (वाहन मालक, रा. नागपूर), टिप्पर क्र. MH 49 CP 0777 चे अज्ञात चालक/मालक, टिप्पर क्र. MH 49 AT 3767 चे अज्ञात चालक/मालक, टिप्पर क्र. MH 40 CT 0009 चे अज्ञात चालक/मालक, टिप्पर क्र. MH 40 CM 9091 चे अज्ञात चालक/मालक, परमेश नलगोपुलवार (प्लॉट मालक, रा. कांद्री), विलास झाडे (रा. कांद्री) आणि ९) वैनगंगा मायनिंग वर्क्स (घाटधारक).

आरोपींनी संगनमताने पर्यावरणाचा ऱ्हास करून शासनाचा महसूल बुडवून चोरीच्या रेतीची वाहतूक व साठवणूक केल्याने त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ४९ ३(५), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव, पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनात पोहवा लिल्हारे व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास आंधळगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.