spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गॅस गळतीमुळे दोन शेतकऱ्यांच्या घराला आग, आगीत १७० क्विंटल कापूस जळून खाक

खापा, वार्ताहर :- खापा तालुक्यातील निमतताई गावात शनिवारी (दि.७) दुपारच्या सुमारास गॅस गळतीमुळे दोन शेतकऱ्यांच्या घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन्ही शेतकऱ्यांची घरे व घरातील मौल्यवान साहित्य पूर्णतः जळून खाक झाले असून तब्बल १७० क्विंटल कापूसही नष्ट झाला आहे. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी दिनेश रेवाराम पुसाने यांच्या पत्नीने मुलांसाठी नाश्ता करण्यासाठी गॅस पेटवला असता अचानक गॅस पाईपमधून गळती सुरू होती. गळती झालेल्या गॅसने तात्काळ पेट घेतल्याने आग भडकली व क्षणात संपूर्ण घराला वेढा दिला. घरात साठवून ठेवलेला सुमारे १२० क्विंटल कापूस आगीत जळून खाक झाला. आगीची तीव्रता इतकी होती की घराबाहेरील बाथरूमचे दरवाजेसुद्धा जळून गेले. मात्र, दिनेश पुसाने यांच्या पत्नीने प्रसंगावधान राखत मुलांसह वेळेत घराबाहेर पडून आपला जीव वाचवला. दरम्यान, आगीचा भडका इतका मोठा होता की शेजारील शेतकरी दयाराम निस्ताने यांचे घरही आगीच्या तडाख्यात सापडले. घटनेच्या वेळी दयाराम निस्ताने यांचे सात महिन्यांचे जुळे नातवंडे घरात होती. कुटुंबीयांनी तत्परतेने त्यांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या आगीत दयाराम निस्ताने यांचे घर व घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुमारे ५० क्विंटल कापूसही नष्ट झाला आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

“प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी”

ही घटना आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांसाठी आणखी एक मोठे संकट ठरली आहे. दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबांकडे सध्या डोक्यावर छत उरलेले नसून घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे. या परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत व नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. नुकसानभरपाई मिळाल्यास शेतकरी कुटुंबांना घरे दुरुस्त करून पुन्हा दैनंदिन जीवन सुरळीत करता येईल, तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

“अग्निशमन दलाच्या गाड्‌या उशिरा”

दाखल खापा नगर परिषद व सावनेर नगर परिषद येथील अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनी आगीवर बर्याच अंशी नियंत्रण मिळवले होते.

Popular Articles