हंसराज, धारगाव :- भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारगाव येथे शनिवारी पहाटे झालेल्या हिट अँड रन अपघातात दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवाजी पंढरी बोधेले (वय 72) व कुंडलिक अमृत वाल्दे (वय 63), दोघेही रा. धारगाव, हे दररोजप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. आज पहाटे सुमारे 5.30 ते 6 वाजताच्या दरम्यान ते कोकणागड फाट्याकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. मृत त्या पैकी एक हे सार्वजनिक बांधकाम विभागातून (पीडब्ल्यूडी) सेवानिवृत्त कर्मचारी होते, तर दुसरा हे टेलर व्यवसायाशी संबंधित होते.
घटनेची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अज्ञात वाहन व चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत.







