– रांचीतील अमानुष मारहाणीसाठी राहुल गांधी आता कुणाचा राजीनामा मागणार?
– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचा घणाघाती सवाल
मुंबई :- झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीविरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रांची येथे झालेल्या अमानुष हल्ल्याचे आदेश कुणी दिले होते, असा सवाल आता राहुल गांधी विचारणार आहेत का आणि कुणाचा राजीनामा मागणार की स्वत: देणार, असे घणाघाती सवाल उपस्थित करत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाकडे तोंड करायचे आणि रांचीमधील आंदोलनाकडे पाठ करायची ही विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची जोरदार टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेशकार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे आणि माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते.
रांची येथे विद्यार्थी शांततापूर्ण, संयमीपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत असताना आणि त्यांनी कोणतीही असभ्य भाषा किंवा अपमानास्पद भाषा वापरली नसताना विद्यार्थ्यांच्या मार्गात काटेरी तार टाकण्यात आली. त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्यात आला. निर्घृणपणे लाठीमार करण्यात आला. शत्रू समजून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून त्याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच असेल. हे सरकार केवळ झारखंड मुक्ती मोर्चाचे नाही. 16 आमदार आणि चार मंत्री घेऊन राहुल गांधी त्या सरकारचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन आता कोणती भूमिका मांडणार आहेत? विरोधी पक्षाने आता कानाचे पडदे बंद केले आहेत का?, असे सवाल ॲड. शेलार यांनी केले.

ॲड. शेलार पुढे म्हणाले, आता राहुल गांधींची विद्यार्थ्यांविषयी वाटणारी सहानुभूती कुठे आहे? दिल्लीत खोटी सहानुभूती दाखवणारे राहुल गांधी, झारखंडमधील विद्यार्थ्यांचे अश्रू पुसायला का जात नाहीत? आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे का मूग गिळून गप्प आहेत? आता मीडियासाठी मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे का बंद आहेत? आता उद्धव ठाकरे रांचीला जाणार आहेत का? विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात काँग्रेस तेथील सरकारमधून बाहेर पडणार आहे का? काँग्रेससह विरोधी पक्षांचे विद्यार्थ्यांवरील हे प्रेम पुतनामावशीचे प्रेम आहे. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त ‘सोयीचे राजकारण’ खेळायचे आहे. जिथे त्यांचे सरकार पोलिसांमार्फत अत्याचार करते, तिथे ते गप्प बसतात आणि जिथे त्यांना राजकीय फायदा मिळवायचा असतो, तिथे ते खोटे वाद निर्माण करतात.
भारतीय जनता पक्ष झारखंडमधील युवक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काँग्रेस पक्ष आणि जेएमएम सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या पाहिजेत. आम्ही झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील क्रूर अत्याचारांचा तीव्र निषेध करतो, असे म्हणत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल देशातील तरुणांची माफी मागावी, अशी मागणी ॲड. शेलार यांनी केली
आता या झारखंडमधील विद्यार्थ्यांना समर्थन देण्याची सीजेपीची भूमिका असेल तर ते वरातीमागूनचे घोडे आहेत. 17 दिवस विद्यार्थ्यांचे आंदोलन होत असताना त्यांना विद्यार्थ्यांचे हित दिसले नाही. म्हणजे बोलवित्या धन्याने फर्मान काढल्यावरच हालचाल करण्यासारखे हे आहे. सिलेक्टिव्ह आंदोलन ही सीजेपीची कार्यपद्धतीच यातून दिसून येत असल्याचे ॲड. शेलार म्हणाले.
राहुल गांधी, लोकसभेतून पळून जाऊ नका! चर्चेला घाबरू नका!
संसद ही लोकांचे प्रश्न सोडवण्याची जागा असते. तिथे केवळ गोंधळच घालण्यापलीकडे विरोधक दुसरे काहीच करत नाहीत. राहुल गांधी वारंवार खोटे बोलून आणि चुकीची माहिती पसरवून लोकशाहीचे सर्वात मोठे मंदिर असलेल्या संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. त्यांचा उद्देश संवाद किंवा तोडगा काढणे नाही, तर केवळ गोंधळ पसरवणे आहे. म्हणूनच ते दररोज आपले लक्ष्य बदलत आहेत. या विरोधकांना उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या तोंडून सत्य ऐकण्याची तयारी ठेवा. त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. पळपुटेपणा करू नका, असा टोलाही ॲड. शेलार यांनी लगावला.





