spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दुचाकीची उभ्या टँकरला धडक, गंभीर अपघात, पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू, अज्ञात ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल

खापा, वार्ताहर :- खापा पोलीस स्टेशन हद्दीतील खापा सिंदेवाणी मार्गावरील रायवाडी फाट्याजवळ (ता. सावनेर) मंगळवारी (दि. ५) रात्री साडेसात आठ वाजता दरम्यान दुचाकी स्वाराने उभ्या टँकरला जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात पती-पत्नी दोघेही घटनास्थळी जागेवरच ठार झाले. श्रावण झिंगू परतेकी (वय ४५ वर्ष), कांता श्रावण परतेकी (वय ३५ वर्ष) असे मृतक पती पत्नीचे नाव असून सवरणी, ता. सौसर जि. छिंदवाडा म. प्र. येथील रहिवासी आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण झिंगु परतेकी व त्यांची पत्नी कांता परतेकी की हे दोघेही सावनेर येथून नातेवाईकांकडून कथेचा कार्यक्रम आटवून दुचाकी क्रमांक एम पी २८ एम पी ०१८३ ने स्वागावी सवरणी येथे जात होते. दरम्यान रायवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला विना नंबरचा एक नादुरुस्त ट्रॅक्टर सह टँकर उभा होता. त्या टँकरला कसल्याही प्रकारे रेडियम, दिशादर्शक अथवा कसल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. रात्रीच्या अंधारात श्रावणला तो उभा ट्रॅक्टर टँकर दिसला नसल्याने दुचाकीसह जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, श्रावण व त्याची पत्नी कांता हे दोघेही अत्यंत गंभीर जखमी झाले.

सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश हिंगे यांनी खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे व सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली. घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हितज्योती आधार फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने पती पत्नीला प्राथमिक आरोग्य केंद्र, बडेगाव येथे प्रथमोपचासाठी दाखल करण्यात आले. तेथून त्वरित ग्रामीण रुग्णालय, सावनेर येथे हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. बुधवारी (दि.६) शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा पंचनामा व प्राथमिक तपास पी. एस. आई. जगदीश पालीवाल आणि त्यांच्या चमूने केला.

ठाणेदार किशोर भुजाडे यांनी वाहन चालकांना विनंती केली की, कुठलाही प्रवास करीत असताना, हेल्मेट घालून अथवा सीट बेल्ट लावूनच करावा. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी ही, वाहन चालकांना विनंती केली की, वाहने ही रस्त्यावर उभे न करता, योग्य ठिकाणी, सुरक्षितपणे दिशादर्शक संकेत लावून उभी करावी. जेणेकरून क्षणभराच्या निष्काळजी पणामुळे कुणाच्याही आयुष्यभराची हानी होणार नाही.

सदर ट्रॅक्टर व टँकर खापा पोलिसांद्वारे त्वरित जप्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अज्ञात वाहन चालक व मालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास खापा पोलीस करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.