किशोर साहू, मौदा :- नेहमीच काळ्या रंगातली किंवा दुकानात मिळणारी डिझाइन्सची छत्री प्रत्येकाकडेच असते. पण आपल्याला आवडतील ते रंग, थीम, डिझाईन हे सगळं तुमच्या छत्रीवर उतरवण्याची संधी देण्यासाठी ‘ जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा भोवरी ‘मध्ये छत्री रंगवण्याची कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातीला पांढऱ्याशुभ्र छत्र्यांना पाण्यानं स्वच्छ धुवून त्यावर कोटिंग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. त्यानंतर अक्रॅलिक रंगांच्या सहाय्याने छत्र्यांना रंगीबेरंगी टच देण्यात आला. यामध्ये, कोणत्या रंगाची निवड करावी, रंगांचा वापर कशा पद्धतीनं होणं आवश्यक आहे, छत्रीचा एखादा भाग मोकळा ठेवून त्याठिकाणी कोणती संकल्पना मांडता येऊ शकते, वयोगटाप्रमाणे छत्रीची थीम कशी बदलते आदी विविध मुद्द्यांबाबत कार्यशाळेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका पठाण तब्बसूम यांनी मार्गदर्शन केलं. छत्री रंगवताना थीम कशी निवडावी हेही त्यांनी समजावून सांगितलं.
यावेळी स्वतःच्या आवडत्या रंगांमधून योग्य ती रंगसंगती साधत, हटके थीम्सचा वापर करत आपली छत्री आकर्षक करण्याची ही कल्पना विद्यार्थ्यांना खूप आवडली.सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा आनंद लुटला.





