किशोर साहू, मौदा :- मागील दीड वर्षापासून सुरू असलेले निमखेडा रेल्वे फाटकावरील शेवटच्या टप्प्यावरील अंडरब्रिज चे काम बंद असल्याने, कामावरील साहित्याची सुरक्षा करणारे सुरक्षारक्षकाशी सोमवार (ता. 11 मे) ला सकाळी नऊच्या दरम्यान प्रत्यक्ष चर्चा केली असता त्यांनी गेल्या अनेक महिन्यापासून हे काम बंद असल्याचे सांगितले. याबाबत येथील इन्चार्ज शमशाद आलम यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांकही दिला. आलम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी ब्लॉकहोल दिसत नसल्याने यंदा पावसाळ्यापर्यंत अंडरब्रिज चे काम शक्य नसल्याचे सांगितले, पुढच्या वर्षीही ब्लॅक होल न दिसल्यास अंडरब्रिज चे काम अपूर्णच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निमखेडा फटकावरील अंडरब्रिज चे काम अनिश्चितकाळासाठी बंद राहणार आहे.
कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या रेल्वे विभागातील वरिष्ठ प्रशासन विभागाने व अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी अंडरब्रिजचे ब्लॅकहोल युद्धपातळीवर शोधून अंडर ब्रिज मधून वाहतूक सुरळीत करावी व निमखेडा रेल्वे फाटकावरील वाहनधारकांना होणारा कमालीच्या त्रास कमी करावा अशी मागणी निमखेडा फाटकापासून त्रस्त जिल्ह्यातील समस्त वाहनधारकांनी केली आहे.