spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ऑपरेशन थंडर अंतर्गत नवीन कामठी पोलिसांचा अनोखा जनजागृती उपक्रम; धर्मगुरू आणि समाजसेवकांच्या सहभागातून ‘नशामुक्त समाजा’चा निर्धार

कामठी :- वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांना बाहेर काढून समाजाला नशामुक्त करण्याच्या उद्देशाने नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ या विशेष मोहिमेला नवीन कामठी पोलिसांनी सामाजिक जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. या अभियानांतर्गत नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या वतीने एसीपी अंकुश खेडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मुख्य उपस्थितीत आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनजागृती कार्यक्रमात विविध धर्मगुरू, समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस अधिकारी एकाच व्यासपीठावर एकत्र येत व्यसनमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

पोलीस ठाणे परिसरात आयोजित या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी “Say No To Drugs”, “Stop Smoking”, “Join The Change” आणि “Be The Change, Quit Today” अशा संदेशांचे फलक हातात घेत अमली पदार्थ, तंबाखू आणि धूम्रपानाविरोधात जोरदार जनजागृती केली. विविध धर्मांचे प्रतिनिधी एकत्र आल्याने कार्यक्रमाला सामाजिक ऐक्याची आणि सकारात्मक परिवर्तनाची विशेष किनार लाभली.

यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी अमली पदार्थांचे वाढते दुष्परिणाम अधोरेखित करत युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून व्यसनमुक्तीच्या चळवळीत सहभागी होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, नवीन कामठी पोलिसांनी विविध धर्मांच्या धर्मगुरूंना आपल्या धार्मिक स्थळांवर येणाऱ्या भाविकांमध्ये अमली पदार्थांविरोधात जागृती निर्माण करण्याचे आवाहन केले. धर्म, समाज आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच नशामुक्त समाजाची उभारणी शक्य असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी सर्व धर्माच्या धर्मगुरूंना बोलावून त्यांना त्यांच्या धार्मिक आस्थापनांमध्ये येणाऱ्या लोकांना अमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्याचे आवाहन करणे बाबत सांगितले जेणेकरून परिणाम दिसून येतील.

‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेचा उद्देश केवळ अमली पदार्थांच्या तस्करीवर आणि सेवनावर आळा घालणे नसून युवकांमध्ये सकारात्मक विचार रुजविणे, कुटुंब व्यवस्था सुदृढ करणे आणि सुरक्षित समाज निर्माण करणे हा आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी सातत्याने जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत.

नवीन कामठी पोलिसांच्या या अभिनव उपक्रमामुळे व्यसनमुक्त आणि नशामुक्त कामठी शहर घडविण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.