किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत बोरी (घिवारी) च्या माध्यमातून गावातील नागरिकांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण, लोकहिताचे आणि प्रत्यक्ष गरजांवर आधारित उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज ग्रामपंचायत कार्यालय येथे पॅरालिसिस रुग्णांना व्हीलचेअरच्या वाटपासह भव्य मोफत आरोग्य शिबिर,संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र तयार करून देणे,पात्र नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड तयार करून देण्याचे कामही करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या एकत्रित सेवा उपक्रमामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाला.
अनेक रुग्णांना चालणे-फिरणे कठीण होत असल्यामुळे दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा रुग्णांना आधार मिळावा, त्यांना स्वतःचे काम स्वतः करता यावे, थोडेफार फिरता यावे तसेच उपचारासाठी किंवा इतर कामांसाठी ये-जा करणे सुलभ व्हावे या सामाजिक भावनेतून ग्रामपंचायत तर्फे गावातील गरजू पॅरॅलिसिस अनेक रुग्णांना अनेक व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीचा हा उपक्रम केवळ मदत नसून गरजू नागरिकांना आत्मविश्वास आणि जगण्याचे बळ देणारा ठरत आहे, असे सरपंच विशाल सेलोकर यांनी यावेळी सांगितले.
सरपंच विशाल सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत नेहमीच इतरांपेक्षा वेगळे, समाजोपयोगी आणि लोकांच्या थेट हिताचे उपक्रम राबवत असून गावातील प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात सहभागी राहण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. “गावाचा विकास फक्त रस्ते आणि इमारतींनी होत नाही, तर गावातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचल्यावरच खरा विकास होतो,” अशी भावनाही सरपंच सेलोकर यांनी यावेळी व्यक्त केली.तसेच इतरही विविध उपक्रमामुळे गरजू नागरिकांच्या वेळ, श्रम व पैशाची बचत होत असल्याने गरजू नागरिकांनी ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे आभार मानले असून असे उपक्रम नियमित राबविण्यात यावे, अशी भावना ही गरजू नागरिकांनी व्यक्त केली आहे
याप्रसंगी सरपंच विशाल सेलोकर, उपसरपंच, सदस्यगण , ग्रामविकास अधिकारी वैभव बावनकर, प्राथमिक आरोग्य कोदामेंढी येथील वैद्यकीय डॉ. समीक्षा महल्ले, सी एच ओ विशाखा कावळे , आरोग्य सहाय्यक वैद्य, आरोग्य सेवक मधुकर राऊत, आशा सेविका रंजना चवळे, डाटा ऑपरेटर प्रवीण भुते, सीआरपी अश्विनी गोंधुळे , अंगणवाडी सेविका दामिनी तिजारे, ग्रा.पं.सोशल मिडिया हॅंडलर अनुज खंडाईत, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.




