यवतमाळ :- शहरातील लकडगंज परिसरातील राणीसती मंदिर येथील बालाजी लॉनमध्ये ‘सकल हिंदू समाज’च्या वतीने आयोजित ‘विशाल हिंदू संमेलन २०२६’ अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाले. या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले परमपूज्य महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री उत्तम स्वामी महाराज यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि जागृतीसाठी हिंदूंनी आता सावध राहण्याची वेळ आली असल्याचे आवाहन केले.
आपल्या आशिर्वचनात उत्तम स्वामी महाराज यांनी सांगितले की, “आजच्या काळात हिंदूंनी आपल्या धर्मावर येणाऱ्या संकटांप्रती अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपण जातीभेद आणि वैयक्तिक मतभेद बाजूला सारून ‘एक हिंदू’ म्हणून संघटित होत नाही, तोपर्यंत धर्माचे पूर्ण सक्षमीकरण होणार नाही.” याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सह बौद्धिक प्रमुख आनंद मोरेश्वरराव पांडे यांचेही प्रेरक उद्बोधन झाले. त्यांनी आपल्या भाषणातून संघाच्या ‘पंचपरिवर्तन’ या संकल्पनेवर सविस्तर प्रकाश टाकला. यामध्ये त्यांनी स्व-बोध, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरिक शिष्टाचार आणि पर्यावरण संरक्षण या पाच महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करत समाजपरिवर्तनासाठी हे घटक कसे आवश्यक आहेत, हे पटवून दिले.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी संयोजक भूपेंद्र परिहार यांच्यासह आयोजन समितीचे अजय मुंदडा, शैलेंद्र दालवाला, विक्रम नागरगोजे, मुकुंद वाघमारे, आशिष विंचुरकर, अभिजीत डोंगरे, जयदीप सानप, सुरज भीसेन, पियुष दुधनकर, यश वर्गणे, कृष्णा बांगर, संकेत वारे, विनोद शर्मा, जितेंद्र लाखे, योगेश यावलकर, विनोद वडे, रामभाऊ भुसेवार, विठ्ठल राठोड, शुभम जाधव आणि नरेंद्र पांडे या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या सर्व कार्यकर्त्यांच्या समर्पित नियोजनाचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.
या संमेलनासाठी यवतमाळ शहर व जिल्ह्यातील हजारो नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या संमेलनामुळे संपूर्ण परिसरात एक नवीन चैतन्य निर्माण झाले असून हिंदुत्वाच्या विचारांना अधिक बळकटी मिळाल्याचे दिसून आले.








