spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा; नगरपरिषदेचे जाहीर आवाहन

– कन्हान नदीची पाणीपातळी घटली; पाणी बचतीसाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन.

खापा, वार्ताहर :- संभाव्य पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेता खापा नगरपरिषदेने पाणी बचतीसाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार २९ ऑक्टोबर २०२६ पासून खापा शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

सध्या कन्हान नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून, पाण्याचा साठा टिकवून ठेवण्यासाठी नदीपात्रात बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. जागतिक स्तरावरील अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपरिषदेने हा निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी आपल्या नळ कनेक्शनला स्वतंत्र तोटी बसवावी, नळ उघडे ठेवून पाणी वाया घालवू नये, तसेच रस्त्यावर पाणी मारणे आणि वाहने धुण्यासाठी नळाच्या पाण्याचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या पाणीटंचाई आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली आहे. ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा जपून वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष पियूष बुरडे, पाणीपुरवठा व आरोग्य सभापती रोशनी शेखर डेरे, सचिन राऊत, मुख्याधिकारी, नगर परिषद खापा यांनी केले आहे.

Popular Articles