संदीप कांबळे,कामठी :- पहाटेची चाहूल लागताच अंगणात, छपराच्या कडेला आणि झाडांच्या फांद्यांवरून सुरू होणारी चिमण्यांची किलबिल… कधीकाळी कामठी तालुक्यातील गावागावच्या सकाळची ही ओळखीची साद होती. मात्र, काळ बदलला आणि परिसराचे रूपही बदलले. जुन्या कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतली, अंगणे आकसली, झाडे कमी झाली आणि त्यासोबतच चिमण्यांचा किलबिलाटही विरळ होत चालला आहे. एकेकाळी घराघरांत सहज दिसणारी चिमणी आता शोधावी लागते, अशी स्थिती कामठी तालुक्यात निर्माण झाली आहे.
घरटी बांधण्यासाठी जागाच उरली नाही
पूर्वी मातीची घरे, कौले, वळचणी, भिंतीतील फटी आणि लाकडी बांधकाम चिमण्यांसाठी सुरक्षित निवाऱ्याचे ठिकाण होते. घराच्या कोपऱ्यात किंवा छपराखाली चिमण्यांनी घरटे बांधणे ही अगदी सामान्य बाब होती. मात्र, आधुनिक बांधकाम पद्धतीत भिंती गुळगुळीत झाल्या आणि घरांच्या रचनेत पक्ष्यांसाठी असलेल्या नैसर्गिक जागा जवळपास नाहीशा झाल्या. त्यामुळे निवाऱ्याच्या शोधात चिमण्यांची भटकंती वाढली आहे.
अन्न-पाण्याचे स्रोतही झाले दुर्मीळ
पूर्वी घरातील धान्य साफ करताना पडणारे दाणे, अंगणातील किडे-कीटक आणि शेती परिसरातील नैसर्गिक अन्न चिमण्यांना सहज मिळत असे. आता बदललेल्या जीवनशैलीमुळे हे नैसर्गिक अन्नस्रोतही कमी झाले आहेत. उन्हाळ्यात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत असल्याने चिमण्यांसह अन्य पक्ष्यांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागते.
वृक्षतोडीचा फटका जैवविविधतेला
कामठी तालुक्यात वाढते नागरीकरण, रस्ते व बांधकामे यामुळे मोकळ्या जागा आणि झाडांची संख्या कमी होत आहे. चिमणी ही पर्यावरणातील बदलांना संवेदनशील असलेली पक्षीप्रजाती मानली जाते. त्यामुळे तिची घटती उपस्थिती ही केवळ एका पक्ष्याची समस्या नसून स्थानिक पर्यावरणातील बदलाची धोक्याची घंटा मानली जात आहे.
‘चिमणी वाचवा’साठी सामूहिक पुढाकाराची गरज
चिमण्यांना पुन्हा घरट्यांसाठी सुरक्षित जागा मिळावी यासाठी घरांच्या गॅलरीत व खिडक्यांजवळ कृत्रिम घरटी लावणे, अंगणात नियमित पाण्याची व्यवस्था करणे, धान्य ठेवणे आणि स्थानिक झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. शाळा, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्रितपणे ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ अभियान राबविल्यास परिस्थितीत बदल घडू शकतो.
आज चिमणीच्या चिवचिवाटाकडे दुर्लक्ष केले, तर उद्या तिची ओळख केवळ आठवणींत उरेल. त्यामुळे कामठी तालुक्याच्या पहाटेला पुन्हा चिमण्यांची किलबिल ऐकू यावी, यासाठी निसर्गाशी जुळलेली जीवनशैली जपण्याची वेळ आली आहे.





