spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दालन वेगळे तरी नगराध्यक्षांच्या दालनात बसण्याचा अट्टाहास कशाला?

– खुर्चीवरून तापले राजकारण

– नागराध्यक्षांनी व्हरांड्यात खाली मांडले बस्तान

हंसराज, प्रतिनिधी भंडारा पवनी :- नगर पालिकेत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेगवेगळे दालन असतांना मी इथेच बसणार या अट्टहासापोटी उपाध्यक्षांनी नगराध्यक्षाच्या दालनात बाजूला बसण्याची व्यवस्था लावल्याने खुर्चीवरून राजकारण तापले असून जनतेच्या कामासाठी नगराध्यक्ष डॉ. विजया नंदूरकर यांनी दालनासमोरील व्हरांड्यात जमिनीवर बस्तान मांडले. सदर घटना गुरुवारी घडली.

पवनी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या डॉ. विजया राजेश नंदूरकर नगराध्यक्ष म्हणून निर्वाचित झाल्या. मात्र त्यांचे दोनच नगरसेवक निवडून आल्याने बहुमतापासून वंचित राहावे लागले. भारतीय जनता पार्टीचे 13, शिवसेनेचे 4 व 1 अपक्ष नगरसेवक आहेत. भाजपचे 13 नगरसेवक असल्याने उपाध्यक्ष म्हणून सोनू बावनकर यांची वर्णी लागली. मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती यांना बसण्यासाठी वेगवेगळे दालन दिले असतांना मी नगराध्यक्षाच्या बाजूला बसणार अशी भूमिका भाजप नगरसेवकांनी घेतली. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर नगर परिषदेत गटनेता सुरेश अवसरे यांच्या नेतृत्वात ठिय्या मांडून नगराध्यक्षाच्या दालनाला कुलूप ठोकले होते. दुसऱ्या दिवशी यातील एकाने मुख्याधिकारी यांचेकडे चाबी दिल्याने बंदिस्त असलेले दालन मोकळे झाले. ऑल वेल झाल्याचे नजरेत आल्याने नगराध्यक्ष नंदूरकर गुरुवारी केबिनमध्ये गेल्या असता तिथे बाजूला उपाध्यक्ष यांची खुर्ची दिसली. परिणामी वादंग न करता त्या व्हरांड्यात जमिनीवर कामकाज चालविण्यासाठी बसल्या. नगर परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याने जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत. गुरुवारी चाललेल्या नाट्यमय घडामोडींची मुख्याधिकारी निलेश इंगोले यांनी दखल घेत दालनात बसण्यासाठी पत्र दिला. सन्मानपूर्वक नगराध्यक्ष यांना केबिनमध्ये बसता आल्याने दुपारी ३ वाजता निर्माण परिस्थितीवर पडदा पडला.

लोकशाही मूल्यांचे हनन!

लोकशाहीत पदाची गरिमा जोपासण्याचे मूल्य असतांना नागराध्यक्षाच्या अधिकारावर गदा आणण्याचे कृत्य लोकशाही मूल्यांचे हनन करणारे असून केवळ दालनात बसण्यासाठीच अट्टाहास नसावा? ज्यांची जागा जिथे आहे तिथेच बसून नगर विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा असा सूचक इशारा जनतेनी दिला आहे.

नगर परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सदस्यांचे दालन निर्माण असल्याने प्रत्यकांनी आपापल्या दालनात बसून शहर विकासाचा आराखडा निर्माण करावा व जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्यावे. हेवे-दावे विसरून एकत्रितपणे काम करावे. प्रशासकीय स्तरावर आमचे सहकार्य राहील

– निलेश इंगोले,मुख्याधिकारी, न.प. पवनी

घडलेला प्रकार लाजिरवाणा असला तरी पदाधिकारी म्हणून जनतेचे काम करतांना कुठेही बसतांना शहराचा विकास व जनतेची कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे मी नगराध्यक्ष पदावर निवडून आली. यातून जनतेचे हित साधावे हा मुख्य उद्देश आहे. मी काम करणारी प्रतिनिधी असल्याने कुठेही बसून शहर विकासाचे कार्य करण्यास तसूभर मागे येणार नाही.

 – डॉ. विजया राजेश नंदूरकर, नगराध्यक्ष न. प. पवनी

माझ्या दालनाची साफसफाई नसल्यामुळे मी नगराध्यक्षाच्या कॅबिनचा जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी उपयोग केला होता. आता निर्माण वाद संपुष्टात आला असून मला मिळालेल्या दालनातच बसून जनतेच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल.

  – सोनू बावनकर, उपाध्यक्ष न. प. पवनी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.