spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रमवीर

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई :- याआधी सलग पाच वर्ष मुख्यमंत्री असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोरले गेल्याने त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला आहे. तीनवेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेले देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रहिताचे अनेक निर्णय घेतल्यानेच सातत्याने जनतेने त्यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे यापुढे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे नेते म्हणून त्यांचा विक्रम होईल यात अजिबात शंका नाही, असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

इन्फ्रामॅन म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले हे महाराष्ट्र ओळखतो आहे. सर्वाधिक वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्या नावावर विक्रम आहे. बीडीडी चाळीत घर देणे, अटल सेतू, मुंबईची मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग असे अनेक लोकहिताचे प्रकल्प देवाभाऊंच्या नावावर आहेत. संजय राऊत, तुमच्या नावावर काय आहे? पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेत तुम्ही केलेला राष्ट्रद्रोहाचा आणि उद्धव ठाकरे यांनी मतांसाठी वडिलांच्या विचारांना तिलांजली देत केलेला अफजलखान, औरंगजेबाच्या दाढ्या कुरवाळण्याचा विक्रम मात्र कोणीही मोडू शकणार नाही, असे बन म्हणाले.

लाडकी बहिण योजना सुरू केल्यापासून संजय राऊत यांचा पोटशूळ का उठतो आहे , असा सवाल करून बन म्हणाले, या योजनेला विरोध केलात तर या लाडक्या बहिणी तुम्हाला असा शाप देतील की तुम्ही पुन्हा राजकारणात उभे राहू शकणार नाहीत. काँग्रेस तर लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून न्यायालयातही गेली होती. पण जोपर्यंत भाजपा – महायुतीचे सरकार आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही. आता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिले जातात. आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते की लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देऊ आणि हे आश्वासनही तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही पूर्ण करणार आहोत.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, अयोध्येतील आंदोलनात प्रभू रामचंद्रांच्या भक्तांवर गोळ्या झाडून ज्यांचे हात रामभक्तांच्या रक्ताने माखून निघाले अशा समाजवादी पार्टीच्या आणि ज्या प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व काँग्रेसने नाकारले होते त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला लाज वाटली नाही का? तुम्हाला राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. रामाच्या भक्तांवर गोळ्या झाडल्या त्यांचा इतिहास हा काळा आहे. त्यांच्याशेजारी बसून तुमचेही तोंड काळवंडले आहे, असे बन यांनी सुनावले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कर्जमाफी निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. कारण कुठलीही निवडणूक नसताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी माफी दिली. संजय राऊत बरोबर म्हणतायेत की पवारसाहेब सगळ्यांना घेऊन चालताहेत. पण शरद पवार फक्त उबाठा गट सोडून पुढे जात असल्याने महाविकास आघाडीत आता उबाठा गट एकटा पडलाय. संपत राऊत यांनी आपला संपूर्ण पक्ष संपून टाकल्याने उबाठा गटात आता एक संजय राऊत आणि दुसरे उद्धव ठाकरे असे दोघेच शिल्लक आहेत, अशा शब्दात बन यांनी फटकारले.

Popular Articles