spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

मुंबई :- देशातील पहिले रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असून या क्लिनिकद्वारे राज्यातील महिलांना अखंडित सेवा द्यावी, या अनुषंगाने महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देशही आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिले.

मुंबई येथे राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिकबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आरोग्य विभागाने राज्यात रजोनिवृत्ती क्लिनिक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. 14 जानेवारी 2026 रोजी सुरू झालेल्या या उपक्रमास अल्पावधीतच राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, महानगरपालिका रूग्णालये तसेच निवडक ग्रामीण रूग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्यात आले असून दर बुधवारी रजोनिवृत्ती बाह्य रूग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. 14 जानेवारी 2026 पासून 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यात 580 ठिकाणी रजोनिवृत्ती क्लिनिक कार्यरत असून, सुमारे 31,288 महिलांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. यापैकी 30,034महिलांना उपचार देण्यात आले असून, 82 प्रकरणे पुढील तपासणीसाठी शिफारस समितीकडे पाठविण्यात आली आहेत.

या क्लिनिकच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, औषध पुरवठा, क्लिनिकसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच गोपनीयता आणि सुविधा उपलब्धतेचे मूल्यांकन करण्याचे निर्देश राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी दिले. तसेच तज्ज्ञ डॉक्टर, ‘एनएचएम’ अंतर्गत इम्पॅनल डॉक्टर आणि सेवाभावी तज्ज्ञांची मदत घेऊन क्लिनिकची संख्या वाढवण्यावर भर देण्याचेही निर्देश दिले.

नोंदी स्वतंत्रपणे ठेवण्यासाठी लाईन लिस्ट व रेकॉर्ड व्यवस्थापनाची व्यवस्था करून, भविष्यात आवश्यक मदत व उपचार सुलभ व्हावा, हा त्यामागील उद्देश असल्याचे असल्याचे सांगून या क्लिनिकसंदर्भात व्यापक जनजागृती व प्रसिद्धीसाठी स्थानिक स्तरावर प्रचार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Popular Articles