spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

निसर्ग अनुभव’ मोहिमेत १९७८ वन्यप्राण्यांचे दर्शन; नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात उत्साह

– मुरदोली प्रवेशद्वारावर पर्यटकांना ४ वाघांचे दर्शन; पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना

हंसराज,भंडारा गोंदिया :- नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या दरम्यान तब्बल १९७८ वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. १ मे ते २ मे २०२६ या २४ तासांच्या कालावधीत गाभा व बफर क्षेत्रातील पाणवठ्यांजवळ ७५ मचाण उभारण्यात आले होते. त्यापैकी २० मचाणांवर देशातील विविध राज्यांतील १५० प्रगणक सहभागी झाले होते.

प्रगणकांकडून प्राप्त माहितीच्या विश्लेषणानुसार वाघ ३, बिबट्या ७, अस्वल ८२, रानगवे ५४८, चौसिंगा २, सांबर ६९, भेकर ५, नीलगाय ११९, चितळ १६७, रानकुत्रे ५५, रानडुक्कर ४०६, रानमांजर १, सायाळ ४, रानससा ४, उदमांजर ७, मुंगूस १, लंगूर ३४१, माकड ८२, मोर ८३, उडती खार १ आणि चांदी अस्वल ४ अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने निसर्गप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, १ मे रोजी सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील मुरदोली येथे नवीन पर्यटन प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. याच ठिकाणी ३ मे रोजी सफारीदरम्यान पर्यटकांना एकाच वेळी चार वाघांचे दर्शन घडल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत असून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळत असल्याचे वनविभागाने सांगितले. भविष्यातही अशा उपक्रमांमुळे पर्यटनवाढीसह स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.