Home Latest News नेत्र तपासणीसाठी जाणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला

नेत्र तपासणीसाठी जाणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला

0
58

तेलकामठी शिवारात मालवाहू वाहनाची धडक; पती-पत्नीचा मृत्यू

सावनेर ९ – नेत्र तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात असताना दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याची दुर्घटना सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात प्राण गमावणाऱ्यांमध्ये राजकुमार जंगलू कुंभारे (वय ५०) आणि इंदू राजकुमार कुंभारे (वय ४७, दोघेही रा. नांदिखेडा, ता. कळमेश्वर) यांचा समावेश आहे.

राजकुमार व इंदू कुंभारे हे एमएच ४० एमबी ४५७० क्रमांकाच्या दुचाकीने नांदिखेडाहून सावनेरकडे जात होते. दरम्यान, सावनेर–काटोल मार्गावरील तेलकामठी शिवारातील वळणावर विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच ४० सीएम ०४९५ क्रमांकाच्या छोट्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात राजकुमार यांचा जागीच मृत्यू झाला, तर इंदू यांना गंभीर जखमी अवस्थेत प्रथम सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

धडक दिल्यानंतर मालवाहू वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ते वाहन रोडलगत उलटले. मात्र चालकाला फारशी दुखापत झाली नाही. पोलिसांनी उपचारानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

सावनेर–काटोल मार्गाचा काही भाग अरुंद असून दोन्ही बाजूंना झुडपे असल्याने या मार्गावरील वळण धोकादायक ठरत आहेत. अशा अपघातांना आळा घालण्यासाठी योग्य ती उपाययोजना तातडीने करण्याची गरज असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या प्रकरणी सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.