spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“गांधी लढे तो गोरों से, हम लढेंगे चोरों से”: कराळे मास्तरांचा सरकारवर हल्लाबोल

– गळ्यात भाज्यांचा हार, डोक्यावर गांधी टोपी; नाशिकच्या शेतकरी मोर्चात घोषणाबाजी

नाशिक :– शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सोमवारी नाशिकमध्ये विराट मोर्चा काढला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात खासदार शरद पवार, अनेक आमदार व पदाधिकारी सहभागी झाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव आणि शेतीसंबंधित इतर मागण्या घेऊन हा मोर्चा धडकला.

या मोर्चात विदर्भातील ठसक्यात भाषण करण्यासाठी प्रसिद्ध झालेले कराळे मास्तर यांचा अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला. “गांधी लढे तो गोरों से, हम लढेंगे चोरों से…” अशा घोषणा देत त्यांनी सरकारला थेट लक्ष्य केले.

भाज्यांचा हार, गांधी टोपीत मास्तरांचा जोरदार ठसा

मंचावर भाषणासाठी आल्यानंतर कराळे मास्तरांनी गळ्यात फळभाज्यांचा हार आणि डोक्यावर गांधी टोपी परिधान केली होती. जयंत पाटील यांच्या भाषणानंतर त्यांना संधी देण्यात आली आणि त्यांनी लगेचच सरकारवर हल्ला चढवला.

कापसावर निर्यातबंदीमुळे बाजारभाव कोसळले असून, राज्याचा हमीभाव 8 हजार असताना प्रत्यक्ष भाव 6 हजारांवर आला असल्याचा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला. “ही संतांची भूमी आहे, पण ‘देवाभाऊ’ सरकारने कर्जमाफीचे व 7/12 कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही. हे सरकार म्हणजे चोरांचे सरकार आहे,” असे टोले मास्तरांनी लगावले.

कांदा शेतकऱ्यांचा तळतळाट – शशिकांत शिंदे

मोर्चाचे नेतृत्व करणारे शशिकांत शिंदे म्हणाले की, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही प्रचंड जनसागर मोर्चात सहभागी झाला. सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ते पूर्ण झाले नाही. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, त्यामुळे कृषिमंत्री टिकाव धरू शकलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

“मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही” – सुप्रिया सुळे

या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही शेतकऱ्यांना संदेश दिला. “आजच्या मोर्चानंतर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन द्या. जर महिन्याभरात सरकारने आश्वासन पाळले नाही, तर हे सरकार खाली खेचू. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.