spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पथ विक्रेत्यांसाठी ‘लोक कल्याण मेळावा’ २ ऑक्टोबर पर्यंत

– पीएम स्वनिधी योजनेत कर्जाची मर्यादा वाढवली

नागपूर :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेला मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या योजनेत पथविक्रेत्यांसाठी कर्जाच्या टप्प्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये, तसेच विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमध्ये १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘लोक कल्याण मेळावा’ आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये पथविक्रेत्यांना कर्ज वाटप,डिजिटल ऑनबोर्डिंगची सुविधा, तसेच पीएम सुरक्षा विमा योजना व पीएम जीवन ज्योती विमा योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पीएम स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेनंतर कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे त्यानुसार, प्रथम टप्पा: १०,००० रुपये ऐवजी १५,००० रुपये, द्वितीय टप्पा: २०,००० रुपये, ऐवजी २५,००० रुपये, तृतीय टप्पा: ५०,००० रुपये करण्यात आली आहे. या वाढलेल्या कर्जासाठी नागपूर महानगरपालिका क्षेत्रात प्रथम टप्प्याकरिता २५३२, द्वितीय टप्प्याकरिता १०८५२ आणि तृतीय टप्प्याकरिता २००६ पथविक्रेत्यांनी अर्ज सादर केले आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व पथविक्रेत्यांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी या शिबिराला भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा. ज्या पथविक्रेत्यांचे सामाजिक व आर्थिक प्रोफाईलिंग सर्वेक्षण पूर्ण झाले नाही, त्यांनी मनपाच्या झोन क्र. १ ते १० मधील समाज विकास विभागाशी संपर्क साधावा, ज्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, त्यांनी योजनेनुसार विभागांना भेट देऊन योजनांचा लाभ घ्यावा. ज्यांचे कर्ज अर्ज बँकेकडे प्रलंबित आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह बँकेला भेट देऊन ‘लोक कल्याण मेळावा’ अंतर्गत आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच ज्या पथविक्रेत्यांना कर्ज मिळाले आहे, त्यांचे सामाजिक आणि आर्थिक प्रोफाईलिंग सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणानंतर त्यांना केंद्र शासनाच्या खालीलप्रमाणे आठ योजनांचा लाभ संबंधित विभागांमार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशी माहिती मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांची दिली.

Popular Articles