नागपूर :- नागपूर महानगरपालिकेने पर्यावरणाचे रक्षणासह बांधकाम-पाडकाम (सी अँड डी) कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण आणि पथदर्शी निर्णय घेतला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपाच्या सर्व विकासकामामध्ये आता किमान १० टक्के रिसायकल अर्थात प्रक्रिया केलेले साहित्य सामग्री वापरणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात आयुक्तांनी एक परिपत्रक जारी केले असून, निर्णयामुळे ‘पर्यावरण (बांधकाम आणि पाडकाम) कचरा व्यवस्थापन नियम, २०२५’ चे पालन नागपूर शहरात अधिक प्रभावीपणे होण्यास मदत मिळणार आहे. सदर निर्णय हा येत्या १३ ऑक्टोबर पासून लागू होणार आहे.
नागपूर महानगरपालिकेने मे. हैद्राबाद सी अँड डी वेस्ट प्रा. लि. यांच्या भागीदारीत भांडेवाडी येथे १५० टन प्रतिदिन क्षमतेचा बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प यशस्वीरित्या सुरू केला आहे. या प्रकल्पातून बारीक वाळू , जाडी वाळू १० मि.मी., २० मि.मी., ४० मि.मी. आकाराची खडी (Aggregate) आणि चिकणमाती (Clay/Loam) हे पुनर्चक्रित साहित्य तयार होत आहे. या सामग्रीची व्हीएनआयटी येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
परिपत्रकानुसार, मनपाने घेतलेल्या सर्व नवीन निविदांमध्ये बेडिंग वर्क्स (Bedding Works), ग्रॅन्युलर सब-बेस (Granular Sub-Base – GSB), पुनर्भरण (Refilling), कुशनिंग (Cushioning/आधार देण्याचे काम) अशा बाबींकरिता पुनर्चक्रित सामग्रीपैकी किमान १० टक्के सामग्री पुनः वापरणे बंधनकारक असणार आहे. विशेषतः बगीचा मार्ग (Garden Pathways), पादचारी मार्ग (Footpaths) आणि मलनिस्सारण वाहिनी/पावसाळी नाली (Sewer/Storm Drain Works) मधील पाईपलाईनचे खोदकाम पूर्ववत करण्याकरिता (अमृत -२ अंतर्गत येणारी कामे वगळता) ही अट त्वरित लागू राहतील.
असे आहेत कंत्राटदारांसाठी नियम:
मनपाने निविदा दस्तऐवजात कंत्राटदारांसाठी पुढील नियम समाविष्ट करणे अनिवार्य केले आहे:
१. प्रमाणांची सक्ती: – कंत्राटदाराने भांडेवाडी येथील सीअँडडी वेस्ट प्रकल्पातून प्रक्रिया केलेले किमान १० टक्के पुनर्चक्रित साहित्य खरेदी करणे अनिवार्य असेल.
२. अनुपलब्धतेचा अहवाल:- ऑपरेटरकडून सामग्री उपलब्ध न झाल्यास, कंत्राटदाराने त्वरित अभियंता-प्रभारी (Engineer-In-Charge) यांना लेखी स्वरूपात त्याची माहिती देणे आवश्यक आहे.
३. अंतिम देयक:- कंत्राटदाराला अंतिम देयक (बिल) केवळ तेव्हाच दिले जाईल, जेव्हा तो प्लांटच्या खरेदीच पुरावा (Invoice) सादर करेल आणि १० टक्के पुनर्चक्रित सामग्री रिसायकल एग्रीगेट वापरल्याचे प्रमाणपत्र अभियंता-प्रभारी देतील. सामग्री उपलब्ध नसल्यास, अभियंता-प्रभारी तसे प्रमाणित करतील.
यामध्ये प्रकल्प ऑपरेटर मे. हैद्राबाद सीअँडडी वेस्ट प्रा. लि. यांची ही जबाबदारी असेल की, उत्पादित साहित्य सर्व तांत्रिक मानके पूर्ण करेल. यासाठी ऑपरेटरला दर महिन्याला व्हीएनआयटीमध्ये सामग्रीची तपासणी करून त्याचा अहवाल नागपूर महानगरपालिकेला सादर करणे अनिवार्य आहे. तसेच, पुनर्चक्रित सामग्रीच्या दरांचा तक्ता नियमितपणे मनपाला सादर करावा लागेल. मनपाच्या या निर्णयामुळे बांधकाम व पाडकाम कचऱ्याचा प्रश्न तर सुटेलच, शिवाय शहराच्या विकासकामांमध्ये पुनर्चक्रित सामग्रीचा वापरामुळे नैसर्गिक स्त्रोतांची बचत होईल वाढेल, ज्यामुळे नागपूर शहर हरित आणि स्वच्छ, सुंदर होण्यास मदत होईल.




