spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सरांडीच्या आरती अंबीलपवारची विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी!

तिरोडा :- तालुक्यातील शासकीय निवासी शाळा, सरांडी, येथील आरती अंबीलपवार हिने विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या शाळेचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे सर्वत्र तिचे आणि तिच्या प्रशिक्षकांचे कौतुक होत आहे.

जबरदस्त लढतीनंतर विजेतेपद

दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रेशीमबाग नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या उत्कृष्ट पैलु खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या आणि उच्च दर्जाच्या स्पर्धेत आरती अंबीलपवारने 14 वर्षे वयोगटात भाग घेतला. पहिल्या फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत तिने जबरदस्त खेळ दाखवला. आपल्या प्रतिस्पर्धकांना अस्मान दाखवत तिने सलग कुस्त्या जिंकल्या आणि अंतिम सामन्यात चंद्रपूर येथील खेळाडूला चितपट करत विजयावर आपले नाव कोरले.

आरती अंबीलपवारच्या या विजयाने गोंदिया जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास आणि कुस्ती या दोहोंमध्ये तिने उत्तम समन्वय साधला. तिच्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विशेषतः कुस्ती प्रशिक्षक उमेश ढवळे यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले.

अभिनंदनाचा वर्षाव

आरती अंबीलपवार हिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शासकीय निवासी शाळा, सरांडी येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गोंदिया किशोर भोयर तसेच मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे यांनी तिचे विशेष कौतुक करत, “आरतीने मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले असून, तिचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा. राष्ट्रीय स्तरावरही ती आपला ठसा उमटवेल,” असा विश्वास व्यक्त केला.

आरतीच्या या यशामुळे तिची निवड आता राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली असून, संपूर्ण जिल्ह्याला तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Popular Articles