spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; दोन शेतकऱ्यांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

सुशांत घाटे, चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष अत्यंत शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये वाघांच्या हल्ल्यांतून नागरिकांचा जीव जाण्याच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन केल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. वाढत्या संघर्षावर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

त्यातच काल चिमूर तालुक्यातील शंकरपूर आणि शिवरा परिसरात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला वनविभागाच्या पथकाने रात्री आठ वाजता जेरबंद करण्यात यश मिळवले.

चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर उपवनक्षेत्राच्या डोमा बीटात २६ ऑक्टोबर रोजी नीलकंठ भुरे (रा. शिवरा) आणि ५ नोव्हेंबर रोजी ईश्वर भरडे (रा. शंकरपूर) या दोघांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सलग दोन घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शंकरपूर येथे नऊ तास मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले होते. “वाघाचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने ६ नोव्हेंबरपासून वाघाला पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेत विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले, तसेच ३५ वनकर्मचारी आणि मजूर चोवीस तास पाळत ठेवून होते.

पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सोमवारी सकाळी वाघाने बांधलेले शिकार ठार केले, आणि संध्याकाळी त्याच परिसरात परतल्यावर वनपथकाने त्याला बेशुद्ध करून जेरबंद केले.या कारवाईनंतर चिमूर तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र जिल्ह्यात वाढत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष ही चिंताजनक बाब ठरत असून, वनविभागाने यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Popular Articles