spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रब्बी पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करा – कृषी विभागाचे शेतक-यांना आवाहन

यवतमाळ :- रब्बी हंगामातील पिकांच्या यशाचे पहिले पाऊल म्हणजे दर्जेदार आणि प्रक्रिया केलेले बियाणे होय. शुद्ध आणि निरोगी बीज हेच समृद्ध उत्पादनाचे मूळ आहे. हवामानातील बदल, जमिनीत असलेले रोगकारक जीवाणू, बुरशी, विषाणू तसेच किडींचा प्रादुर्भाव या काळात वाढतो. अशा परिस्थितीत बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक ठरते, असे आवाहन कृषी विभागाने शेतकरी बांधवांना केले आहे.

योग्य पद्धतीने केलेल्या बीजप्रक्रियेमुळे बियाण्याचे अंकुरण चांगले होते, रोगप्रतिबंधक क्षमता वाढते आणि पिकाची सुरुवातीची वाढ सक्षम होते. बीजप्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. यामुळे बियाण्यापासून आणि मातीतून प्रसारित होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. पिक उगवणीनंतरच्या पहिल्या ३० ते ३५ दिवसांत रसशोषक किडींपासूनही पिकाचे रक्षण होते. परिणामी, किड आणि रोग व्यवस्थापनावरील खर्चात बचत होते तसेच उत्पादनात लक्षणीय वाढ होते. जैविक खतांच्या बीजप्रक्रियेमुळे झाडांना आवश्यक अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात आणि पिकाची वाढ जोमदार होते.

बीजप्रक्रिया करताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रक्रिया करताना हातमोजे, मास्क आणि चष्म्याचा वापर करावा. बियाणे प्लास्टिक शीट, बारदाणा किंवा यंत्राद्वारे प्रक्रिया करावे. प्रक्रिया केलेले बियाणे कोरड्या आणि सावलीच्या ठिकाणी वाळवावे. रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया योग्य क्रमाने करणे गरजेचे आहे प्रथम रासायनिक बुरशीनाशक, त्यानंतर रासायनिक किटकनाशक, आणि ३ ते ४ तासांनी जैविक बुरशीनाशक व जीवाणू संवर्धक जसे रायझोबियम, अझोटोबॅक्टर, केएमबी किंवा पीएसबी यांची प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केलेले बियाणे ३ ते ४ तासांच्या आत पेरणीसाठी वापरणे अधिक परिणामकारक ठरते, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.

Popular Articles