किशोर साहू मौदा ,ता. ३०:- जि.प. प्राथमिक शाळा तोंडली येथे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.
या प्रसंगी मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांनी महात्मा फुले यांच्या समाज जागृतीतील कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. सहशिक्षक निलेश जाधव यांनी ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण, स्त्री-शिक्षण, सत्यशोधक चळवळ आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानाविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित भाषणे, कविता सादरीकरण तसेच देशाच्या प्रगतीत शिक्षणाचे महत्त्व सांगणारे उपक्रम सादर केले.
कार्यक्रमात सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी संपूर्ण समाजामध्ये समानता, बंधुता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला.








