spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धार्मिक स्थळ उपेक्षित, शहरात मुख्य मार्गावर बाजाराच्या अतिक्रमणाने वाहतूक कोंडी, खापा मध्ये ‘पार्किंग झोन’ आहेत तरी कुठे ?

– स्वच्छतागृहाचीही शोधाशोध करतात गावखेड्यातील महिला, रस्ता बांधकामामुळे नागरिकांच्या घराचे दरवाजे खाली आणि पावसाळ्यात पाणी घरात

खापा :- खापा शहरात नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पण, गेली तीन वर्षे प्रशासकाच्या ताब्यात सत्ता असूनही शहराचा विकास कागदावरच अडकून राहिल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. अरुंद रस्ते, पाण्याची कमतरता, अतिक्रमण, दुबार रस्ता बांधकामामुळे नागरिकांच्या घराचे दरवाजे खाली आणि पावसाळ्यात पाणी घरात, सार्वजनिक सोयीसुविधांचा अभाव आणि नाल्यांची दुर्दशा या समस्या कायम आहेत.

“धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व”

खापा शहरात हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद कन्हान नदीच्या तीरावर दर्गा आहे. या स्थळाला तीर्थस्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त आहे. तर सावनेर नाका येथे संत पतिराम महाराज यांचे समाधी स्थळ आहे. या दोन्हीं दर्गा आणि मंदिर परिसराचा विकास हा अपुरा आहे. येथे येणाऱ्या भक्तांकरिता भक्त्तनिवास होणे गरजेचे आहे. तसेच त्या दर्गा परिसरात स्वच्छ व निर्मळ पाणी मिळण्याकरिता वॉटर फिल्टर लागणे आवश्यक आहे. तसेच सावनेर पारशिवनी मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असून कन्हान नदीच्या काठावर नदीच्या पुलाजवळ माऊली माता मंदिर आहे. याही मंदिराला उत्तम असा शोभनीय नदी किनारा लाभलेला आहे. त्यामुळे तेथे पर्यटन स्थळ निर्माण करून तिथे रोजगार उपलब्ध करून देण्याची छान संधी आहे. या सर्व धार्मिक स्थळावर दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. या दर्गा व मंदिर परिसराकरिता मोठ्या निधीची गरज आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तेथीलही विकास करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

“बगीचे, ओपन स्पेसमधील ग्रीन जीम शोभेची वस्तू”

शहरातील बगीच्यांत ग्रीन जीम लावण्यात आले. नागरिकांनी व्यायाम करावे. तंदुरुस्त राहाते, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु, काही गार्डनचे गेट बंद आहे. काही गार्डनमध्ये कचरा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चुन तयार केलेले ग्रीन जीम शोभेची वस्तू ठरत आहे. बहुतेक गार्डनमध्ये अशीच स्थिती आहे. शहरातील बहुतांश गार्डनमध्ये झुडपे वाढली आहेत. ग्रीन जीमचा उपयोग होत नाही. नियमित देखभालीचा अभाव दिसून येतो.

“मुख्य बाजारपेठेत हवे स्वच्छ प्रसाधनगृह”

१) शहरातील मुख्य बाजारपेठेत ग्रीन सिटी बारलगत असलेल्या प्रसाधनगृह सध्या क्षतिग्रस्त होण्याचा मार्गावर आहे. कधी येथील प्रसाधनगृहात पाणी राहते. तर कधी राहात नाही. त्या प्रसाधनगृहाची सफाई कधी होते तर कधी नाही.

२) लगतच बार असल्याने महिला प्रसाधनगृहाला जाण्यास बऱ्याचदा नाकारतात. त्यामुळे तेथे महिलांची गैरसोय होते. स्थानिक व्यापारी संकुलात प्रसाधनगृह आहेत, पण स्थानिक दुकानदार यांनी तिथे अतिक्रम केले असल्याने ग्राहक तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्यांची मोठी फजिती होत असते.

३) जुन्या बस स्थानक परिसरात मच्छी मार्केट ग्राहकांची मोठी रेलवचेल असते. येथे प्रसाधनगृह असुन त्याकडे नगर परिषद लक्ष देत नाही. आठवडी बाजाराच्या दिवशी महिला व पुरुषांची तारांबळ उडते.

४) भवानी माता मंदिर चौकात एकही प्रसाधन गृह नाही. त्यामुळे तेथील स्थानिक दुकानदार व नागरिकांची त्या परिसरात मोठी फजिती होत असते.

“मोकाट जनावरे रस्त्यावर”

शहरातील बाजार चौक, भवानी माता मंदिर चौक, बँक ऑफ बडोदा चौक येथे भर रस्त्यावर मोठ्चा प्रमाणात रात्रंदिवस गुरेढोरे बसलेली असतात. याची विल्हेवाट आजपावेतो झालेली नाही. या गुराढोरांच्या मोकाटपणामुळे किरकोळ अपघात झाले आहेत. तसेच शहरातील बेवारस कुत्र्यांच्या हैदोसाने अनेक नागरिक त्रस्त आहे. या मोकाट कुत्र्यांचा नसबंदीचा उपक्रम आतापर्यंत नगर परिषदने राबविलेला नाही.

“पार्किंगची असुविधा”

बाजार परिसरात होणारे दुकानदारांचे अतिक्रमण, तसेच पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनचालकांना तारेवस्तीच कसरत करावी लागत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी साधी मोटारसायकल शहराबाहेर काढण्याकरिता चांगलीच दमछाक करावी लागते. याबाबतीत नगरपंचायतीने ठोस पाऊल उचलावी, अशी मागणी आहे. जुना बसस्थानक, जिजामाता शाळा, बँक ऑफ बडोदा चौक, शहरातील मुख्य मार्ग येथे मोठ्या प्रमाणात पार्किंगची असुविधा आहे. यावर ठोस व निर्णायक पाऊल उचलणे गरजेचे आहे.

“रोडच्या बांधकामामुळे नागरिकांचे घर खाली आणि रस्ते वर”

शहरात विविध योजना अंतर्गत विविध परिसरात रोडचे बांधकाम झाले. काही वर्षानंतर हे रस्ते कधी नळ योजना बांधकामाच्या नावाने तर कधी अंडरग्राउंड विजेचे तार टाकण्याचा नावाने तर कधी भूमिगत नालीच्या नावाने खोदण्यात आले. यामुळे खडबडीत झालेले रस्ते दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा त्यावरच रस्ते बनविण्यात आले. त्यामुळे जुना रस्ता हा जसाच्या तसाच राहून त्यावर नवीन रस्ता बनवल्याने नागरिकांचे घर खाली आणि रोड वर अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकाच्या घरात पावसाचे पाणी जाते आणि नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. ही समस्या संपूर्ण शहरात उपस्थित झालेली आहे.

कोट :-

शहरात विविध भागात रस्ते बांधकाम करण्यात आले. ते रस्ते खराब झाल्यावर पुन्हा त्याच रस्त्यावर, रस्ते बांधण्यात येत असून, त्यामुळे रस्ते वर आणि घर खाली जात आहे. त्यातून नागरिकांच्या घरात पावसाळ्याचे पाणी जाते. हा त्रास शहरात सर्वीकडे होत आहे. किमान जुना रस्ता खोदून नवीन रस्ता बनविण्यात यावा.

– लॉयर आशिष कुंभारे, सामाजिक कार्यकर्ते

विकासाबरोबरच महिलांना सुरक्षा हवी. रात्री पोलिसांनी गस्त करावी. फुकट आश्वासन नको. विकासाचे ठोस निर्णय हवेत. मतदानापुरतेच लॉलीपॉप नको. करून दाखचा तरच महिला मतदान करतील.

– वंदना सुपारे, सामाजिक कार्यकर्त्या

सार्वजनिक प्रसाधनगृह व शौचालयांची निर्मिती करणे गरजेचे आहे. यामुळे शहरात येणाऱ्या महिला तसेच पुरुषांची गैरसोय होणार नाही. खापा शहर हे प्राचीन काळात नावलौकिक प्राप्त शहर आहे.

– सुरेश पावडे, नागरिक

खापा शहर हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. एकीकडे कन्हान नदी तर नदी काठी लष्कर शाह शहीद दर्गा, आणि सावनेर नाका येथे संत पतिराम महाराज समाधीस्थळ परिसराचे सौंदर्याकरण करणे गरजेचे आहे. पर्यटनाचा दर्जाही या समाधीस्थळाला मिळू शकते.

– रितेश गुप्ता, समाजसेवक

शहरातील ग्रीम जिम सध्या बकाल अवस्थेत आहेत. पावसाळ्यात या परिसरात जाणे अवघड होते. या परिसराचा विकास झाल्यास लहान मुले, महिलांना लाभ होईल. काही प्रभागात ग्रीम जिम कुठे आहेत, हे शोधावे लागते.

– सचिन भैसारे, सामाजिक कार्यकर्ता

ग्राहक वाहने घेऊन येतात. अनेकदा वाहने लावण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. अशा वेळी निराशेने परतही जातात. निदान भवानी माता मंदिर चौक आणि जुने बसस्थानक परिसर अशा दोन ठिकाणी तरी पार्किंग झोन असले पाहिजे. यामुळे बहुतांश समस्या सुटतील.

– प्रज्वल नंदनवार, सामाजिक कार्यकर्ते

एखादी मिरवणूक रॅली निघाली तर वाहतूक कोंडी दिसून येते. अशावेळी दुकानांसमोर उभे करण्यात आलेल्या वाहनांमुळे अनेकांची गोची होते. पार्किंग व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

– खेमाजी डेकाटे, ज्येष्ठ नागरिक

एकीकडे महिला सक्षमीकरणाचा गाजावाजा चांगलाच वाजविला जातो. ५० टक्के आरक्षणाचेही बोल बोलले जाते. अशा वेळी महिलांसाठी स्वच्छतागृहध नाही, ही बाब गंभीर आहे. लोकप्रतिनिधींनी हा गंभीर प्रश्न सोडविण्याची आवश्यकता आहे.

– मुमताज शेख, गृहिणी

आता शाळा या पैसे कमावण्यासाठी काढल्या आतात. शहरात नदी स्वच्छ नाही. बाजाराला जागा नाही. ट्रैफिक सेन्स नाही. घाणीचे साम्राज्य आहे. दुकानांचे अतिक्रमण थांबत नाही. शहराचा विकास कासवगतीने सुरू आहे. यात वेग पकडणे गरजेचे आहे.

– सतिश डेकाटे, नागरिक

तक्रारी ऐकून त्यावर योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणांची सुधारणा व्हावी. विकासकामांमध्ये पारदर्शकता याची. निधीचा योग्य वापर व्हावा, भ्रष्टाचारमुक्त कामकाज अपेक्षित आहे. सर्वं समाज घटकांना समान न्याय देत मतदारांशी संवाद ठेवला पाहिजे.

– मंगेश बोंदरे, सामाजिक कार्यकर्ते 

शहराच्या काही भागात उंथ, खोल असा भाग आहे. उंच भागात पाणीपुरवठा कमी होतो. नवीन पाइपलाइन लावणे आवश्यक आहे. यामुळे सर्वांना शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळेल.

– प्रणाली भगत ,गृहिणी

Popular Articles