– केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते मनपाच्या 70 मीटर उंच हायड्रोलिक प्लाटफॉर्मचे लोकार्पण
नागपूर :- नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग व महारेलतर्फे होणाऱ्या एकूण २९८० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज (सोमवारी) केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कामांमुळे नागपूर शहराला एक नवे रुप मिळणार असून अव्वल दर्जाच्या पायाभूत सुविधांमध्ये नागपूर शहर विकसित होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गड्डीगोदाम चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक व हरीहर मंदिर चौकात हे तिन्ही कार्यक्रम आज पार पडले. यात हरीहर मंदिर लकडगंज उड्डाण पूल व उंच इमारतींना लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेत आलेल्या 70 मीटर उंच हायड्रोलिक प्लाटफॉर्मचे लोकार्पण सुद्धा आज केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते हरीहर मंदिर चौकात झाले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार विकास कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नासुप्रचे सभापती संजय मिना, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. मध्य रेल्वेचे डीआरएम दीपक गुप्ता, मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते. 

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी शहरातील विविध भागात विकास काम केली जात आहे. यात झोपडपट्टी विकास विकास वाहतूक विभाग, सिमेंटचे रस्ते, नाल्याच्या सुरक्षा भिंत, अग्निशमन केंद्रांची उभारणी, पाणी पुरवठ्यासाठी पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम, तलावांचे सौंदर्यीकरण, नागरी प्राथमिक वेलनेस सेंटर, ईव्ही चार्जिंग स्टेशन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीचा प्रामुख्याने समावेश आहे. तिन्ही कार्यक्रमात मनपाच्या ४३० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच १३० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले असे एकूण ५६० कोटी रुपयांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. तर नासुप्रच्या एकूण ३५० विकास कामांचे भूमिपूजन व १७५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५० कोटी रुपयांच्या आर.बीआय ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यानच्या रस्ता सिमेंटीकरण कार्याचे भूमिपूजन करण्यात आले. तर १५० कोटी रुपयांचे महामेट्रो राम मंदिर ते प्रजापती चौक दरम्यानच्या रस्ता सिमेंटीकरण कार्याचे भूमिपूजन करण्यात आले. महारेलतर्फे राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या 7 रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी), 1 रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी), 3 भुयारी मार्ग व हरीहर मंदिर लकडगंज उड्डाण पुलाचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या समारंभाला व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शविली.
रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र – मुख्यमंत्री फडणवीस
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृक्श्राव्य माध्यमातून जनतेशी संवादसाधला. महाराष्ट्रात 500 वर रेल्वेचे फाटक आहेत. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राचे सर्वांगीण विकास करण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराला वेगळे रुप मिळेल – केंद्रीय मंत्री गडकरी
नागपूर शहरात विविध विकास कामे होत असून यातून येत्या काही वर्षात नागपूर शहराला नवे रुप मिळेल व पायाभूत सुविधांमध्ये नागपूर शहर अव्वल राहील, असा विश्वास केंद्रीय वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. गेल्या दहा वर्षात पूर्व नागपूरचे चित्र बदलले आहे. यासाठी आमदार कृष्णा खोपडे सातत्याने पाठपुरावा करीत राहतात. अजूनही पुन्हा काही कामे पूर्व नागपुरात होत आहे. शहराच्या रिंग रोडसाठी 3600 कोटी रुपये मंजूर केले आहे. पोद्दारेश्वर मंदिर ते प्रजापतीनगरपर्यंत सिमेंट रस्ता होणार आहे.
विकसित महाराष्ट्राचे स्वप्न – पालकमंत्री बावनकुळे
यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवे नागपूर वसणार असून नागपूर शहराचा आणखी विकास होणार असल्याचे सांगितले. विकसित महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कटिबद्ध आहे. या विकसित महाराष्ट्चे एक व्हीजन मुख्यमंत्र्यांनी तयार केले आहे. त्यानुसार यापुढे पावले टाकली जातील व विकासकरून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महापालिकेत आणखी 100 ईबसेस येणार तसेच 90 आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू होत असल्याचे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी विदर्भ व मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. उड्डाण पुलांच्या बांधकामामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
विकासात महापालिकेचे योगदान – आमदार कृष्णा खोपडे
पूर्व नागपूरच्या विकासामध्ये महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा मोठा वाटा असून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सकारात्मक सहकार्याची मदत झाल्याचा आवर्जून उल्लेख आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर सिम्बॉयसीस, नरसी मोंजी सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांचे जाळे पूर्व नागपुरात विणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहरात झालेल्या विकास कामांची माहिती यावेळी दिली. शहरात झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी इतवारीतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी मल्टी लेव्हल पार्किंग सुविधा करण्यात आली आहे. नागनदीतील प्रदूषण करण्यासाठी नरसाळा येथे एसटीपी उभारण्यात आल्याचे सांगितले. यावेळी महापालिका व नासुप्रने पूर्ण केलेल्या प्रकल्पांची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी केले.
प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे पुष्पहाराने स्वागत केले. तसेच हरीहर मंदिर समितीच्यावतीने अर्जुन वैरागडे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, चेतना टांक, नरेंद्र बोरकर, सरिता कावरे, राजकुमार साहू, समिता चकोले, प्रदीप पोहाणे, पिंटू झलके, दीपराज पार्डीकर, श्रीकांत आगलावे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर व रेणुका देशकर यांनी केले. आभार रेल्वेचे जितेंद्र शर्मा यांनी मानले.
महापालिकेच्या निधीतून शहरातील विकास कामाच्या लोकार्पण व भूमीपूजन झालेल्या कामांची यादी.
– नागरी स्था. स्व. संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित सेवा, व सुविधा अंतर्गत एकूण 262 कामे (310.04 कोटी)
– शहरात स्मार्ट टॉयलेटचे बांधकाम – (9.15 कोटी)
– शहरातील प्रमुख 11 चौकांचा विकास – (5.51 कोटी)
– इतवारी, शांतीनगरातील कुत्तेवाला बाबामठाचे व शिवमंदिराचा जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण – (31.48 कोटी)
– भांडेवाडी येथे श्वान निवार केंद्राची उभारणी – (6.89 कोटी)
– गोरेवाडा येथे विसर्जन कुंड – (22.34 कोटी)
– उमरेड रोड ते गॅस गोडाऊन दिघोरी रस्त्याचे रुंदीकरण – (3.40 कोटी)
– संघर्ष नगर येथे नाल्याची सुरक्षा भिंत – (2.25 कोटी)
– लकडगंज व गंजीपेठे येथे अग्निशमन केंद्राचे उभारणी –(24.01 कोटी)
– हुडकेश्वर व नरसाळा येथे क्रीडा व सांस्कृतिक विभागाअंतर्गत विकास कामे – (1.67 कोटी)
– खामला, इंदोरा, नारा येथे 15 लक्ष क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम –(15.62 कोटी)ॉ
– नाईक तलाव, पोलीस लाईन टाकळी व बिनाकी मंगळवारी तलावांचे सौंदर्यीकरण –(17.37 कोटी)
– टर्शरी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी – (1.40 कोटी)
– हुडकेश्वर व नरसाळा येथे नवीन जलवाहिनी –(2.27 कोटी)
– गांधीसागर तलावचे सौंदर्यीकरण – -(5.30 कोटी)
– नरसाळा परिसरात विजेचे खांब उभे करून एलईडी लाईट लावणे –(4.99 कोटी)
– शहरात व्हर्टिकल गार्डनची निर्मिती – (4.91 कोटी)
– लता मंगेशकर उद्यान ॲव्हेंचर पार्कची निर्मिती – (8.79 कोटी)
– एनएमसी स्मार्ट मित्र चॅट डीजीटल सुविधा – (24.78 लाख)
– 70 मीटर उंचीचे हॅड्रोलिक प्लाटफॉर्म – (15.10 कोटी)
– स्मार्ट सिटी अंतर्गत 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (48.31 कोटी)
– इतवारीत मल्टिलेव्हल पार्किंगची सुविधा – (3.96 कोटी)
– शहरात 7 यूएचडब्ल्यूसीचे बांधकाम – (1.29 कोटी)
– आयसोलेशन रुग्णालयात औषधी भांडार – (12 कोटी)
– मनपा शाळांते विज्ञान केंद्र – (1.12 कोटी)








