खापा :- वनसंवर्धन आणि शाश्वत उपजीविका निर्मिती यांचा प्रभावी समन्वय साधणाऱ्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर येथे हस्तनिर्मित लँटाना कॅमेरा फाईल निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. हा अभिनव “वीड टू वेल्थ (तणातून संपत्ती)” उपक्रम पर्यावरणीय आव्हानांना समुदायाधारित आर्थिक संधींमध्ये रूपांतरित करण्याचा आदर्श नमुना आहे.
या प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वनभवन, नागपूर येथे करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबल प्रमुख (HoFF) एम. श्रीनिवास राव यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हा उपक्रम भारतीय जंगलांमधील अत्यंत आक्रमक व घातक तण असलेल्या लँटाना कॅमेराच्या वैज्ञानिक उपयोगावर आधारित आहे. लँटाना कॅमेरा नैसर्गिक पुनरुत्पादनास अडथळा निर्माण करतो, वन्यजीवांच्या हालचाली मर्यादित करतो तसेच त्याच्या ज्वलनशील स्वरूपामुळे जंगलातील आगीचा धोका लक्षणीयरीत्या वाढवतो. या प्रकल्पाअंतर्गत जंगलातील लँटाना कॅमेरा नियोजनबद्धरीत्या काढून टाकून त्यापासून पर्यावरणपूरक हस्तनिर्मित कार्यालयीन फाईल्स तयार करण्यात येत असून, त्यामुळे अधिवास सुधारणा, जंगलातील आग धोका कमी करणे व शाश्वत संसाधन व्यवस्थापनास चालना मिळत आहे.
प्रकल्पाची संकल्पना यशस्वीरीत्या सिद्ध झाल्यानंतर, उत्पादन कार्य पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी (UC) परिक्षेत्रातील, पारशिवनी तालुक्यातील बफर क्षेत्रात असलेल्या आवळेघाट गावातील महिला स्वयंसहायता गटामार्फत राबविण्याचा मानस आहे. या उपक्रमाच्या केंद्रस्थानी महिलांवर आधारित उपजीविका निर्मिती असून, महिला सदस्यांना कच्चा माल प्रक्रिया, कागद निर्मिती, फाईल तयार करणे व अंतिम फिनिशिंग यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे नियमित उत्पन्न, कौशल्यवृद्धी व दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन साध्य होणार आहे. तसेच, उपजीविका आणि पर्यावरणीय पुनर्संचय यांचा थेट संबंध जोडून स्थानिक समुदायांमध्ये वनसंवर्धनाबाबत मालकीभाव निर्माण होणार आहे.
या प्रकल्पाची संकल्पना व नेतृत्व अक्षय गजभिये, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांनी केले असून, आक्रमक तण व्यवस्थापनाच्या आव्हानाला समुदायाधारित उपजीविका मॉडेलमध्ये रूपांतरित करण्याचा त्यांचा दूरदृष्टी पूर्ण विचार या प्रकल्पामागे आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) व मुख्य वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी तसेच श्रीलक्ष्मी ए., भा.व.से., क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. सहायक वनसंरक्षक संदीप भारती व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण लेले यांनी ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पेंच टायगर कन्झर्वेशन फाउंडेशनमार्फत क्षमता वृद्धी, प्रशिक्षण, आवश्यक साधनसामग्री व यंत्रसामग्रीची खरेदी तसेच उत्पादन युनिट उभारणीसाठी आवश्यक सहाय्य देण्यात येणार असून, त्यामुळे महिला स्वयंसहायता गटाला शाश्वत व व्यावसायिक पद्धतीने कार्य करता येणार आहे.
या पर्यावरणपूरक लँटाना कॅमेरा फाईल्सचा वापर शासकीय विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, CSR उपक्रम, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, इको-फ्रेंडली स्टेशनरी बाजारपेठ, हॉटेल्स, रिसॉर्ट्स व कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी करता येणार असून, विविध क्षेत्रांमध्ये हरित खरेदी (Green Procurement) पद्धतीला प्रोत्साहन मिळणार आहे.
हा प्रकल्प आक्रमक तण व्यवस्थापनाला उपजीविका निर्मिती, महिला सक्षमीकरण व जैवविविधता संवर्धनाचे प्रभावी साधन बनविण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा असून, महाराष्ट्रासह इतर वनपरिसरांसाठीही हा एक अनुकरणीय व पुनरुत्पादनीय मॉडेल ठरणार आहे.




