spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अमरावती-मुंबई विमानसेवा आठवड्यातून दोनच दिवस!

अमरावती :- अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा दाट धुक्यामुळे १ ते १५ डिसेंबरदरम्यान बंद ठेवण्यात आली. आता विमानसेवा पूर्ववत सुरू झाली असली, तरी डिसेंबरमध्ये आठवड्यातून दोनच दिवस ही विमानसेवा उपलब्ध राहणार आहे. त्यातही वेळेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. यापुर्वीही खराब हवामानामुळे विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. २ जानेवारीपासून आठवड्यातून चार दिवस विमानोड्डाण होऊ शकेल, अशी माहिती अलायन्स एअरने दिली आहे. अलायन्स एअरने गेल्या २६ ऑक्टोबरपासून हिवाळी वेळापत्रकात महत्वपूर्ण बदल केले.

दुपारच्या ऐवजी सकाळी ९.१५ वाजता विमान उड्डाण सुरू झाले आणि सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस ही विमानसेवा सुरू करण्यात आली. पुर्वीच्या वेळापत्रकानुसार मुंबईहून दुपारी ३.२५ वाजता उडणारे विमान हे सायंकाळी अमरावती विमानतळावर पोहचत होते आणि सायंकाळी ५.३५ वाजता मुंबईसाठी उड्डाण घेत होते आणि सायंकाळी ७.२० वाजता मुंबईत पोहचत होते. या वेळांमुळे प्रवाशांना दिवसभराची कामे करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने ही विमानसेवा सोयीची नसल्याची तक्रार होती. त्यामुळे विमानसेवा सकाळी सुरू करण्यात आली.

पुन्हा वेळेत बदल

हवामानात सातत्याने होणारा बदल आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानतेच्या समस्यांनी विमानसेवेला फटका बसत आहे. त्यामुळे मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आहे. सोमवार, शुक्रवार असे दोन दिवस प्रवाशांना मुंबई ये-जा करता येणार असून, अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेने दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी झेपावेल, असे नवे वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे यापूर्वी १ ते १५ डिसेंबर यादरम्यान अमरावती-मुंबई विमानसेवा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता. आता अलायन्स एअर कंपनीने वेळेत बदल आणि आठवड्यातून दोनच दिवस विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून अमरावती विमानतळावर विमान दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. वातावरणात बदलामुळेच विमान सेवेच्या वेळेत बदल करण्यात आल्याची बाबदेखील स्पष्ट करण्यात आली आहे.

२ जानेवारीपासून पूर्ववत?

येत्या २ जानेवारीपासून पुन्हा वेळेत बदल करण्यात येऊन अमरावतीहून सकाळी ९.१५ वाजता विमान उड्डाण घेऊ शकेल आणि रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे चार दिवस विमानसेवा सुरू राहील, असे संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे. जानेवारीतील बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे.

Popular Articles