spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाईगिरी’ सुटली, आता देशभक्तीची गोडी; न्यू कामठी पोलिसांचा गुन्हेगारी रोखण्यासाठी ओपरेशन थंडर अंतर्गत ‘डिजिटल’ सर्जिकल स्ट्राईक

कामठी :- सोशल मीडियाच्या विळख्यात अडकून चुकीच्या मार्गाला लागलेल्या अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी न्यू कामठी पोलिसांनी एक कौतुकास्पद प्रयोग केला आहे. ‘लॉरेन्स बिश्नोई’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे गुन्हेगारीकडे झुकणाऱ्या २४ किशोरवयीन मुलांचे हृदयपरिवर्तन करून पोलिसांनी त्यांना आता ‘देशभक्ती’च्या वाटेवर आणले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

न्यू कामठी परिसरात दोन अल्पवयीन गटांत झालेल्या वादावादीनंतर पोलिसांनी जेव्हा मुलांचे मोबाईल तपासले, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. या मुलांनी चक्क ‘लॉरेन्स बिश्नोई ग्रुप’ तयार केला होता. या ग्रुपमध्ये शस्त्रास्त्रांची ऑनलाइन खरेदी, अश्लील व्हिडिओ क्लिप्स शेअर करणे आणि गुन्हेगारी जगताचे आकर्षण वाढवणारी चर्चा सुरू होती. ही सर्व मुले १६ ते १७ वर्षे वयोगटातील होती.

महिला हवालदाराची नवी दिशा

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार दीप्ती मोटघरे यांनी पुढाकार घेतला. दडपशाही किंवा अटकेची कारवाई करण्याऐवजी त्यांनी ‘सुधारक’ भूमिका स्वीकारली.

पोलीस हवालदार दीप्ती मोटघरे यांनी पालकांचे समुपदेशन केले

सर्वप्रथम सर्व २४ मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली.

पोलिसांनी जुना ग्रुप नष्ट करून एक नवीन व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. विशेष म्हणजे, हवालदार दीप्ती मोटघरे स्वतः या ग्रुपच्या ‘ॲडमिन’ बनल्या.

व्याख्यानातून परिवर्तन

या ग्रुपमध्ये आता शस्त्रांऐवजी थोर महापुरुष, स्वातंत्र्यसेनानी आणि राष्ट्रभक्तांच्या कथा शेअर केल्या जातात. मुलांना दररोज एका स्वातंत्र्यसेनानीचा अभ्यास करून पोलीस ठाण्यात येऊन त्यावर छोटे व्याख्यान देण्याचे काम देण्यात आले आहे.

‘ऑपरेशन थंडर’ अन्‌ सावरलेले भविष्य

या मुलांचे वय पाहता, वेळीच हस्तक्षेप केला नसता तर त्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले असते. आम्ही त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी देशोन्नतीच्या प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. झोन ६ चे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांनी न्यू कामठी पोलिसांच्या या संवेदनशील आणि सकारात्मक उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.

पोलीस फक्त गुन्हेगार पकडत नाहीत, तर गुन्हेगार घडू नये म्हणून प्रयत्नही करतात, हेच या उपक्रमातून सिद्ध झाल्याचे बोलल्या जात आहे. यात पोलीस निरिक्षक महेश आंधळे व पोलिस हवालदार दीप्ती मोटघरे मोलाची भूमिका साकारत आहेत.

Popular Articles