पांढरकवडा :- खंडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे शिबीर व अजिंक्यपद स्पर्धा २०२५ साठी पांढरकवडा येथील सात खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ‘अंश क्रीडा व बहुउद्देशीय संस्था’ संचलित कराटे प्रशिक्षण केंद्राचे हे खेळाडू प्रशिक्षकांसह खंडाळ्याकडे रवाना झाले आहेत.
खंडाळा येथे दिनांक २८ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत भव्य राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन प्रसिद्ध कराटे तज्ज्ञ हंशी परमजीत एस. सिंग यांनी केले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर पांढरकवडा येथील खेळाडू आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत.
अंश क्रीडा व बहुउद्देशीय संस्था (F-0022476/YVT) द्वारा संचालित प्रशिक्षण केंद्रातील ईश्वरी रामकृष्ण गेडाम, मनस्वी मुकेश माथुर, गौरी योगेश पडोळे, खुशी सोनूदीप सिंहा, अर्हत राहुल मेश्राम, पृथ्वीराज संदीप संदलवार, ओम प्रवीण कुमरे खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. हे सर्व खेळाडू सेन्साई योगेश पडोळे आणि हितेश नागभीडकर या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या निवडीमुळे पांढरकवडा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








