spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने रुग्णांचे हाल-बेहाल

– प्राथमिक आरोग्य केंद्रचा कारभार सलाईनवर

– आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची मनमानी व उद्धटपणा 

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या पूरक सुविधा मिळाव्यात, म्हणून शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. नगरधन येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली असून, बेजबाबदार कर्मचारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदे, गैरहजेरी, कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणामुळे आणि औषधींचा तुटवडा असल्याने नगरधन आरोग्य केंद्रच आजारी पडल्यामूळे रुग्णांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले आहे. सहा खाटांची सुविधा असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन, काचूरवाही, चिचाळा व डोंगरी या चार उपकेंद्रांसह तब्बल २६ गावांना सेवा देत आहे. मात्र एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रासाठी आवश्यक असलेली जबाबदारी येथे कुणीही घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्मचारी कार्यालयीन वेळेवर येत नाहीत, ओपीडी उशिरा सुरू होते आणि रुग्णांशी उद्धट वर्तन केले जाते, असा गंभीर आरोप नगरधनचे पोलीस पाटील नितेश सावरकर व ग्रा.पं. सदस्य सचिन दशहरे यांनी केला आहे. पोलीस पाटील नितेश सावरकर हे आपल्या आईला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन आले असता डॉक्टरांनी तपासणी करून रक्त तपासणीसाठी पाठविले. मात्र प्रयोगशाळा सहाय्यक गैरहजर असल्याने आधीच १५ ते १६ रुग्ण तासन्‌तास प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले. उपस्थित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन जबाबदारी झटकण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळताच ग्रा.पं. सदस्य सचिन दशहरे यांनी दवाखान्यात धाव घेतली. यावेळी डॉ. फरहान रहमान यांच्याकडे प्रयोगशाळा सहाय्यक सचिन डोनाळे यांच्या गैरहजेरीबाबत जाब विचारला असता त्यांनी सांगितले की, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आकाश चांदेकर हे १२ व १३ जानेवारी रोजी नागपूर येथे प्रशिक्षणासाठी गेले असून त्यांच्या अनुपस्थितीत चार्ज सचिन डोनाळे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात प्रयोगशाळा सहाय्यक सचिन डोनाळे हे वारंवार उशिरा येत असल्याचा तसेच रुग्ण व लोकप्रतिनिधींशी उद्धट वर्तन करत असल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य सचिन दशहरे यांनी केला आहे. हालचाल रजिस्टर तपासले असता गैरहजेरीची कोणतीही नोंद नसल्याचे उघड झाले. या गंभीर व संतापजनक प्रकाराची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रा.पं. सदस्य सचिन दशहरे यांनी दिला आहे.

1) ही बाब अधिकच गंभीर आहे. डॉ. फरहान रहमान यांनीही कबूल केले की, प्रयोगशाळा सहाय्यकांना चार ते पाच वेळा फोन करुन येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

2) परिणामी रक्त तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. दरम्यान, पोलीस पाटील नितेश सावरकर यांनी दवाखान्यातील परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त करत दवाखान्यात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे.

3) कर्मचारी ऐकत नाहीत, कार्यालयीन वेळेची कोणालाही पर्वा नाही. हा आरोग्य केंद्राचा कारभार नव्हे तर लोकांच्या जीवाशी खेळ आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.