गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात हत्तीरोग (फायलेरिया) आजाराचे उच्चाटन करण्यासाठी हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम दिनांक १० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे उद्घाटन आज सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील ओपीडी हॉल येथे संपन्न झाले.
सदर मोहिमेच्या उद्घाटनादरम्यान उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना हत्तीरोगच्या औषधींचे वाटप करण्यात आले आणि या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना DEC, Albendazole सोबतच आयवरमेक्टीन गोळ्या या तीन औषधांचे उंची व वयोगटानुसार सेवन करून हत्तीरोगापासून संरक्षण करण्याचे आवाहन डॉ. वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली यांचेमार्फत करण्यात आले. मात्र 2 वर्षाखालील बालक, गर्भवती स्त्री, स्तनदा माता (एक आठवड्याच्या आतील) व गंभीर आजारी यांनी हत्तीरोगच्या औषधींचे सेवन करण्यात येऊ नये.
हत्तीरोग हा दीर्घकालीन आजार असून वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय केल्यास तो पूर्णपणे टाळता येऊ शकतो. या मोहिमेदरम्यान गडचिरोली व चामोर्शी तालुक्यामध्ये एकूण 3 लाख २३ हजार नागरिकांना औषधींच्या गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली डॉ. वर्षा लहाडे, डॉ. छाया उईके (अति.जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली), डॉ. बागराज धुर्वे (निवासी वैद्यकीय अधिकारी, गडचिरोली), डॉ. अमित साळवे (अति.जिल्हा आरोग्य अधिकारी,गडचिरोली), डॉ. सुजाता वाडीवे (जिल्हा हिवताप अधिकारी), डॉ. रुपेश पेंदाम (हत्तीरोग अधिकारी) तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी व पथकांमार्फत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात घरोघरी भेट देऊन औषध वितरण करण्यात येणार असून, एकही पात्र नागरिक औषध सेवनापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष दक्षता घेण्यात येत आहे. हत्तीरोगमुक्त गडचिरोली जिल्हा घडविण्यासाठी सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली यांनी कळविले आहे.








