spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदर्श शाळेकडे वाटचाल – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीचा प्रेरणादायी प्रवास 

किशोर साहू, मौदा ,ता.११:- मौदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली ही शाळा आज तालुका व जिल्हास्तरावर “आदर्श शाळा” म्हणून नावलौकिकास प्राप्त होत आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धती, शिक्षकांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या बळावर शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

सन २०२४–२५ या शैक्षणिक वर्षात शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या स्पर्धेत तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरावर “विनोबा पुरस्कार” प्राप्त करून मानाचा तुरा रोवला आहे. ही शाळेसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

याशिवाय शाळेने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी, क्रीडा स्पर्धा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेतही शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट छाप पाडणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली ही आज गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक ठरत आहे.

शाळेचा विकास केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. विज्ञान प्रदर्शनी, नाणे प्रदर्शन, चित्रप्रदर्शन, बाल विज्ञान मेळावा, सांस्कृतिक स्पर्धा अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व आत्मविश्वासाला चालना मिळाली आहे.

विद्यार्थ्यांसाठी २५० पेक्षा अधिक पुस्तकांनी समृद्ध वाचनालय उपलब्ध असून स्वतंत्र संगणक कक्षात तीन डेस्कटॉप संगणकांची सुविधा आहे. संगीत वाद्यांची उपलब्धता, बाला पेंटिंगने सजलेला आकर्षक परिसर, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा तसेच परसबाग उपक्रमांमुळे शाळा सर्वार्थाने समृद्ध होत आहे.

क्षेत्रभेटी, वनभोजन, मुलाखती तसेच NSQF अंतर्गत प्रशिक्षण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिले जात आहे. जीवनकौशल्यांचा विकास हा शाळेच्या कार्याचा केंद्रबिंदू ठरला आहे.

या सर्व यशामागे मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व अथक परिश्रम तसेच सहशिक्षक निलेश जाधव यांचे समर्पित कार्य मोलाचे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शाळेने प्रगतीची नवी उंची गाठली आहे.

शाळेच्या प्रगतीची दखल घेऊन शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेची प्रगती अधिक वेगाने होत आहे.

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे प्रेरणादायी केंद्र बनली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे तोंडलीची शाळा तालुका व जिल्ह्यात आदर्श शाळा म्हणून उज्ज्वल वाटचाल करत आहे.

Popular Articles