spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोंगेझरा येथील प्राचीन शिवमंदिरात शिवलिंग पुनर्स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य आयोजन

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांचा पुढाकार; १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान भक्तीमय सोहळा

यासीन शेख गोंदिया :- गोरेगाव तालुक्यातील पुरगाव (हिरडामाली) येथील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक केंद्र असलेल्या पोंगेझरा देवस्थान परिसरात एक अभूतपूर्व धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे. १८९८ मध्ये स्थापित झालेल्या या प्राचीन शिवमंदिरात शिवलिंग पुनर्स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य आयोजन १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या विशेष पुढाकाराने आणि श्री शंकर देवस्थान समितीच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. ऐतिहासिक वारसा आणि आध्यात्मिक महत्त्व हे मंदिर केवळ एक वास्तू नसून परिसराच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. सन १८९८ मध्ये स्व. दलीराम रहांगडाले व स्व. हरीराम रहांगडाले यांनी या मंदिराची स्थापना करून भक्तिमार्गाची मुहूर्तमेढ रोवली होती. या प्राचीन मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपत, आधुनिक काळात या स्थळाचा कायाकल्प करण्यासाठी आणि शिवलिंगाची शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्स्थापना करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे. चार दिवसीय कार्यक्रमांची रूपरेषा:

या धार्मिक महोत्सवात वैदिक परंपरेनुसार विविध विधी पार पडणार आहेत:

१. गुरुवार, १२ फेब्रुवारी (प्रारंभ): सोहळ्याचा शुभारंभ सकाळी ९:३० वाजता होईल. यामध्ये विधिवत शिवपूजन, जल-दूध अभिषेक आणि पंचामृत स्नानाने मंदिराचा परिसर शिवमय होणार आहे.

२. शुक्रवार, १३ फेब्रुवारी (शोभायात्रा): या दिवशी अन्न सयन आणि महाआरती होईल. दुपारी भक्तीमय वातावरणात भव्य ‘शिव शोभायात्रा’ काढण्यात येईल, जी संपूर्ण गावासाठी आकर्षणाचे केंद्र असेल.

३. शनिवार, १४ फेब्रुवारी (प्राणप्रतिष्ठा): हा दिवस सोहळ्याचा मुख्य दिवस असेल. सकाळी रुद्राभिषेक आणि दुपारी अत्यंत मंगलमयी वातावरणात शिवलिंगाची ‘प्राणप्रतिष्ठा’ केली जाईल. याद्वारे शिवलिंगामध्ये दिव्य चेतनेची स्थापना होईल.

४. रविवार, १५ फेब्रुवारी (महाशिवरात्री व महाप्रसाद): महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पहाटे अभिषेक, सकाळी हवन व पूर्णाहुती होईल. दुपारी भाविकांसाठी विशाल महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक ऐक्याचा संदेश या आयोजनामागे केवळ धार्मिक विधी नसून परिसरात सुख, शांती, समृद्धी आणि सामाजिक ऐक्य प्रस्थापित व्हावे, हा उदात्त हेतू असल्याचे आयोजक पंकज रहांगडाले यांनी सांगितले. या निमित्ताने तालुक्यातील सर्व समाजघटक एकत्र येऊन आध्यात्मिक उर्जेचा अनुभव घेतील.समितीचे नियोजन व आवाहन हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री शंकर देवस्थान समितीचे सदस्य अनंत ठाकरे, थांणसिंग रहांगडाले, पंकज रहांगडाले, देवेंद्र रहांगडाले, मोरेश्वर रहांगडाले, जितेंद्र रहांगडाले, डॉ. एफ. सी. रहांगडाले, एकनाथ ठाकरे, हेतराम रहांगडाले, अक्षरलाल पटले, सुशील खोब्रागडे, मुन्नालाल कटरे, राजेंद्र पारधी, शिवचरण रहांगडाले, चैतराम सहारे, निरंजन पटले, चिरंजीव चव्हाण, रामचंद रहांगडाले, ओमकार ठाकरे, केशवराव कोठेवार, रामजी वाघाळे, तानेश्वर रहांगडाले व समस्त समिती सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

या पवित्र सोहळ्याला परिसरातील सर्व शिवभक्तांनी, भाविकांनी आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून महादेवाच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे कळकळीचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.