– दोन वर्षांपासून ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत; लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे संताप
हंसराज,प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या हिरापूर , मोहगाव खुर्द आणि शक्करधरा या तीन आदिवासी गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. निधीची कमतरता आणि अर्धवट बांधकामामुळे या तिन्ही गावांतील जलकुंभ कोरडे पडले असून, कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही योजना निष्फळ ठरल्याचे चित्र दिसत आहे.
हिरापूर, मोहगाव खुर्द व शक्करधरा या आदिवासी बहुल गावांतील नागरिकांची तहान भागवण्यासाठी ‘हर घर नल’ योजना सुरू करण्यात आली होती. २०२१ मध्ये या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि २०२२ मध्ये कामाचे आदेश देण्यात आले. २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही जलकुंभांचे काम अद्याप अपूर्णच आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर भटकंती करावी लागत आहे.
प्रशासकीय दुर्लक्ष आणि नियोजनाचा अभाव
धुटेरा ही गट ग्रामपंचायत असून यात सक्करधरा, घानोड, हिरापूर हमेशा व मोहगाव खुर्द या गावांचा समावेश होतो. या गावांमधील अंतर ८ ते १० किलोमीटर असल्याने प्रशासकीय कामात मोठी अडचण निर्माण होत आहे. शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी या दुर्गम भागाकडे फिरकत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. सक्करधरा व घानोड या गावांचे अंतर कमी असल्याने, विकासाला गती मिळण्यासाठी स्वतंत्र गट ग्रामपंचायत निर्माण करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
प्रशासनाकडून केवळ ‘तारीख पे तारीख’
जलकुंभाचे काम पूर्ण करण्यासाठी तुमसर येथील आमदारांच्या जनता दरबारात हा प्रश्न मांडण्यात आला, मात्र त्यावर अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही. योजनेचा उद्देश शुद्ध पाणी पुरवणे हा होता, परंतु आजची परिस्थिती पाहता ही योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.
प्रतिक्रिया
“सक्करधरा, हिरापूर हमेशा व मोहगाव खुर्द या तिन्ही गावांच्या जलकुंभांचे बांधकाम अर्धवट असल्याने ही योजना गावकऱ्यांसाठी केवळ एक ‘दिवास्वप्न’ ठरली आहे. पंचायत समितीच्या जनता दरबारात हा प्रश्न आम्ही उचलून धरला, परंतु प्रशासनाकडून याची अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.”
— दीपक कल्याण उईके (सरपंच, ग्रा.पं. धुटेरा/घानोळ)
प्रतिक्रिया
“चिखला क्षेत्रातील या तिन्ही गावांच्या अर्धवट जलकुंभांच्या कामाबाबत मी जिल्हा परिषद भंडारा येथे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ‘निधीची कमतरता’ असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
— कृष्णकांत बघेल (जिल्हा परिषद सदस्य, चिखला क्षेत्र)








