spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामचुकार अधिकाऱ्यांची गय करणार नाही; खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रशासनाला भरला दम

– मोहाडी तहसील कार्यालयात आढावा बैठक; प्रलंबित समस्यांवरून अधिकाऱ्यांचे टोचले कान

हंसराज,प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- तहसील कार्यालय मोहाडी येथील सभागृहात आयोजित जनता आढावा बैठकीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. “जनतेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या आणि कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. यावेळी तालुक्यातील विविध विभागांच्या प्रलंबित समस्यांचा डोंगर खासदारांसमोर मांडण्यात आला.

आढावा बैठकीत मोहाडी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जमिनीचे पट्टे, घरकुल, अवैध रेती उत्खनन, पाणी टंचाई, वीज समस्या, वनविभाग आणि भूमी अभिलेख विभागाशी संबंधित तक्रारींचा पाऊस नागरिकांनी पाडला. विशेषतः भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी जनतेला सहकार्य करत नसल्याच्या आणि त्यांच्या कामात प्रचंड उदासीनता दिसून येत असल्याच्या तक्रारी लेखी स्वरूपात देण्यात आल्या.

बैठकीत बावनथळी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नसल्याचा मुद्दा गाजला. तसेच ‘जल जीवन मिशन’ योजना केवळ कागदावरच असून ती पूर्णपणे फसवी ठरल्याची टीका करण्यात आली. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती मिळत नसून, घरकुलाच्या नावाखाली रेतीची अवैध विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला. “खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल द्या आणि त्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्या, यात कोणतीही टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही,” असे निर्देश खा. पडोळे यांनी दिले.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, अपंग आणि मानधनावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे पैसे वेळेत जमा होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच तहसील कार्यालयात अतिरिक्त पैशांची वसुली तात्काळ बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. आरोग्य विभागाने औषधींचा पुरवठा वेळेत करावा आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांची लूट थांबवावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

तालुक्यातील अवैध व्यवसाय आणि रेतीची तस्करी थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कडक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या. आढावा बैठकीदरम्यान खासदारांनी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याकडून कामाचा अहवाल घेत, प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी निश्चित वेळ ठरवून दिली.

या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र इलमे, आशिष पात्रे, शहराध्यक्ष विजय शहारे, तालुकाध्यक्ष राजेश हटवार, राजेश निबार्ते, आकाश बोंद्रे यांच्यासह उपविभागीय अधिकारी (तुमसर), तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO), पोलीस निरीक्षक आणि विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles