– नवरगाव शिवारात कारवाई: १ हजार किलो सडवा मोहफूल आणि साहित्य जप्त
हंसराज,प्रतिनिधी भंडारा तुमसर :- तालुक्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने नवरगाव शेतशिवारात धाड टाकून एका अवैध हातभट्टीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवरगाव येथे मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने नवरगाव शेतशिवारातील नाल्याच्या काठी धाड टाकली.
यावेळी आरोपी लक्ष्मण मदन गुर्वे (वय ४५ वर्ष, रा. नवरगाव, ता. तुमसर) हा नाल्याच्या किनारी हातभट्टी चालवताना मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून १ हजार किलो सडवा मोहफूल (किंमत १ लाख रुपये) आणि दारू गाळण्याचे इतर साहित्य (किंमत ८,८०० रुपये) असा एकूण १ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध तुमसर पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. २४७/२०२६ नुसार कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (तुमसर) शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

