spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- आगामी काळात साजरे होणारे होळी आणि रमझान ईद हे सण शांततेत आणि जातीय सलोख्यात पार पडावेत, यासाठी भंडारा पोलीस दलाच्या वतीने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस मुख्यालय येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बैठकीत संवाद साधताना नूरुल हसन म्हणाले की, आगामी सर्व सण व उत्सव सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन, पारंपरिक पद्धतीने आणि एकोप्याने साजरे करावेत. समाजात बंधुभाव आणि प्रेम वाढीस लागण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तरुणांसाठी ‘दिशा’ प्रकल्प

तरुण पिढीला योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी पोलीस दलातर्फे ‘दिशा’ प्रकल्प हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जनतेच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळेच पोलिसांचे हे उपक्रम यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सण-उत्सवांच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांनी आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या बैठकीला उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, विलास काळे, शिवम विसापुरे, तहसीलदार संदीप माकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील शांतता समितीचे पदाधिकारी, विविध धर्मांचे व समाजाचे प्रतिनिधी, पोलीस पाटील, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक आणि भंडारा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles