spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्हा परिषदेतील ७६७ रिक्त पदे तात्काळ भरा; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची आग्रही मागणी

– शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांच्या साखळी उपोषणाला खासदारांचा जाहीर पाठिंबा

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. तब्बल ७६७ पदे रिक्त असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्था कोलमडली असून, ही पदे तात्काळ भरण्याच्या मागणीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. तसेच, या मागणीसाठी साखळी उपोषणाला बसलेले शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांच्या आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ७६७ पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडचणी येत आहेत. ही पदे भरण्याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाची दखल घेत खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना पत्र पाठवून या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. “जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रिक्त पदांमुळे शाळा ओस पडत असतील, तर ते अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेऊन तत्काळ पदभरतीची कार्यवाही सुरू करावी,” असे खासदारांनी पत्रात नमूद केले आहे.

खासदार पडोळे यांनी आंदोलस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठबळ दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ७६७ रिक्त पदे तात्काळ भरून शिक्षण व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.”

प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आगामी काळात हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles