spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘आरटीई’ प्रवेश अर्जांची मुदत संपुष्टात…  

पुणे :- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी २ लाख ८७ हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. आता अर्जांसाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रवेशासाठीची ऑनलाइन सोडत आणि प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. यंदा आरटीई प्रवेश अर्जांमध्ये घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा आरटीई प्रवेशांसाठी राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८३३ जागा उपलब्ध झाल्या आहेत. आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा निवडण्याचे शिक्षण विभागाने घातलेले बंधन उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर शिक्षण विभागाने एक किलोमीटरची मर्यादा काढून अर्ज भरण्यासाठी पालकांना संधी उपलब्ध करून दिली. त्यानुसार अर्ज भरण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र, आधी अर्ज भरलेल्या पालकांनाही नव्याने अर्ज भरणे आवश्यक असल्याने अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली. या मुदतीत २ लाख ८७ हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याचे आरटीई संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ३ लाख ५ हजार १५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे यंदा अर्जांची संख्या घटल्याचे दिसून येते.

प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, ‘आरटीई प्रवेश अर्जांसाठी आता आणखी मुदतवाढ देण्यात येणार नाही. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राशी (एनआयसी) चर्चा करून प्रवेशासाठीची ऑनलाइन सोडत, प्रवेशप्रक्रिया वेळापत्रकाच्या तारखा स्वतंत्रपणे लवकरच जाहीर करण्यात येतील.

Popular Articles