नागपूर :- तांत्रिक कामगार युनियन (५०५९) संचालित रुग्णवाहिका सेवा लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती कंत्रा टी कामगार असोसिएशन चे कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.
तांत्रिक कामगार यूनियनच्या सर्व केंद्रीय पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून विशेष सहकार्य केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी दिले आहे.विक्की कावळे, मंगेश चिमोटे आणि निलेश चक्रपाणी यांच्या संकल्पनेतून ही रुग्णवाहिका सेवा साकारली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत वेळेत वैद्यकीय सेवा मिळावी, रुग्णांना सुरक्षितरित्या रुग्णालयात पोहोचवता यावे तसेच सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी सेवा उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
तांत्रिक कामगार युनियनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, नागरिकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून सेवा जनतेसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती युनियनच्या वतीने देण्यात आली.








