Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अडयाळ ग्रामीण रुग्णालयाच्या निकृष्ट बांधकामाची सखोल चौकशी करा; खा. डॉ. प्रशांत पडोळे यांचे कडक निर्देश

हंसराज,भंडारा  :- भंडारा जिल्ह्यातील अडयाळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी स्थानिक  नागरिकांनी वारंवार केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रुग्णालयाच्या नवीन इमारतीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक या बांधकामाविषयी तक्रारी करत होते. नागरिकांच्या आग्रहाखातर डॉ. पडोळे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता, बांधकामात वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. नवनिर्मित इमारतीला आत्ताच मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून,

स्लॅबचे कामही दोषपूर्ण आहे. चकित करणारी बाब म्हणजे, भर उन्हाळ्यातही या इमारतीचा स्लॅब गळत असल्याचे निदर्शनास आले. इमारतीमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असून, भविष्यात रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी भीती खासदारांनी व्यक्त केली.

‘ठेकेदाराची देयके थांबवा’ यावेळी बोलताना खा. डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले की, “आरोग्य सेवा हा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित विषय आहे. अशा

महत्त्वाच्या कामात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही. जोपर्यंत या कामाची पूर्ण चौकशी होत नाही आणि गुणवत्ता सुधारली जात नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराची देयके (Payments) अदा करू नयेत.” त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या निकृष्ट कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

जुन्या रुग्णालयाचीही केली पाहणी नवीन इमारतीच्या पाहणीनंतर खासदारांनी जुन्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. स्थानिक नागरिकांनी यावेळी आपल्या विविध समस्या खासदारांसमोर मांडल्या.

ग्रामीण भागातील जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा डॉ. प्रशांत पडोळे यांनी यावेळी संबंधित विभागाला दिला. या पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी, नागरिक आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.