– भोयर गावात धडक कारवाई
यवतमाळ :- जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि बाल संरक्षण कक्ष सतर्क असून, एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यवतमाळ तालुक्यातील भोयर येथे होणारे हे दोन्ही विवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे थांबविण्यात आले.
भोयर गावातील दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलींचा विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती ‘चाईल्ड हेल्प लाईन १०९८’ ला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे बाल संरक्षण कक्षाने तत्काळ अंगणवाडी सेविकांकडून मुलींच्या वयाची पडताळणी केली. सरकारी नोंदीनुसार दोन्ही मुलींचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे हा विवाह कायद्याने ‘बालविवाह’ ठरत होता.
दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी प्रशासकीय पथकाने मुलींच्या घरी जाऊन पालकांचे समुपदेशन केले. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार, मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. प्रशासनाने पालकांना ताकीद दिली की, अल्पवयात लग्न लावल्यास केवळ कुटुंबीयच नव्हे, तर लग्नाशी संबंधित सेवा देणारे (मंडप, डेकोरेशन, फोटोग्राफर, आचारी इ.) व्यावसायिक देखील कारवाईस पात्र ठरतात. अशा गुन्ह्यासाठी १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
सदर दोन्ही मुलींना पालकांसह ‘बाल कल्याण समिती’ समोर हजर करण्यात आले. ही यशस्वी कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर आणि चाईल्ड हेल्प लाईन समन्वयक फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या पथकात चाईल्ड हेल्प लाईनचे गणेश आत्राम, पूजा शेलारे, भोयरचे पोलीस पाटील मनोज मेश्राम, अंगणवाडी सेविका प्रणाली मेश्राम, आशा वर्कर सुलोचना सापोडे तसेच यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक जाधव व पोलीस कॉन्स्टेबल कैलास लोथे यांचा समावेश होता.
चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर संपर्क साधा
जिल्हा बाल संरक्षण कक्षाने जनतेला आवाहन केले आहे की, जर कुठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास ग्रामसेवक (बालविवाह प्रतिबंधक अधिकारी), सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील किंवा चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.