spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागरिकांनी जनगणनेच्या देशव्यापी स्वगणना मोहिमेत सहभागी व्हावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

– मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली कुटुंबासह स्व-गणना

मुंबई :- जनगणना 2027 च्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आपली माहिती संगणकाद्वारे एसई पोर्टल वर नोंदविली.

राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती जनगणना 2027 च्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत एसई पोर्टलवर नोंदवून जनगणनेच्या देशव्यापी स्व-गणना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे, तसेच जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस यांनी मुख्य सचिव यांना स्मृतीचिन्ह दिले.

महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांच्या हस्ते गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनाही स्मृतिचिन्ह देण्यात आले.

भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच, देशातील प्रत्येक व्यक्तीला स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्व-गणना ही जनगणनेतील अशी प्रक्रिया आहे, ज्यात व्यक्ती जनगणनेची माहिती वेब पोर्टलद्वारे नोंदवितात. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना (एसई) पोर्टल 1 मे, 2026 ते 15 मे 2026 पर्यंत कार्यरत राहील. भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयाद्वारे एक वेब पोर्टल (https://se.census.gov.in) विकसित करण्यात आले आहे. हे पोर्टल जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सोयीस्कर माध्यम उपलब्ध करून देते त्यामुळे कुटुंबांना त्यांच्या सोयीनुसार त्यांची माहिती भरता येते. जनगणना प्रगणक जेव्हा घरी भेट देतील, तेव्हा स्व-गणनेद्वारे नोंदविलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम सादरीकरणासाठी त्यांना स्व-गणना आयडी (एसई आयडी) देणे आवश्यक असेल. राज्यातील प्रत्येक व्यक्तीने ही जबाबदारी स्वीकारुन मोठ्या संख्येने ‘स्व-गणना’ सुविधेचा पर्याय निवडावा. जेणेकरून कुटुंबाची नोंद अचूकता आणि कार्यक्षमतेने होईल, असे आवाहनही मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.