spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा जिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार; रक्ताच्या शोधात असलेल्या वृद्धेचा विनयभंगाचा प्रयत्न

– नारी सशक्तीकरण सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कडक कारवाईची मागणी

हंसराज, भंडारा :- भंडारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या एका वृद्ध महिला नातेवाईकाचा, तेथीलच एका कंत्राटी कर्मचाऱ्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शासकीय रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी ‘नारी सशक्तीकरण

सामाजिक संघटना, भंडारा’ तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर वृद्ध महिला आपल्या रुग्णासाठी रक्ताची सोय करण्यासाठी रुग्णालयात फिरत होती. यावेळी तेथील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने त्या महिलेला मदतीचे आमिष दाखवले. “मी तुम्हाला रक्त मिळवून देतो,” असे सांगून त्याने वृद्ध महिलेला गाठले आणि तिच्याशी अश्लील चाळे करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी आणि ते ही मदतीच्या बहाण्याने असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

महिला सुरक्षा वाऱ्यावर? या घटनेनंतर नारी सशक्तीकरण सामाजिक संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेचे मार्गदर्शक व समाजभूषण पुरस्कार प्राप्त सूर्यभान हुमने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, “शासकीय रुग्णालयात रुग्ण किंवा त्यांच्या महिला नातेवाईक सुरक्षित नसतील, तर महिलांनी जायचे कुठे?

संपूर्ण महाराष्ट्रात चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत महिलांवर अत्याचार होत आहेत. भंडारा येथील ही घटना प्रशासनासाठी लाजीरवाणी असून, यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले आहेत.”

संघटनेच्या प्रमुख मागण्या:  

🔹पीडित वृद्ध महिलेला न्याय मिळावा आणि आरोपी कंत्राटी कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.

🔹 अशा नराधमांना कामावरून तात्काळ काढून टाकून त्यांना कडक शासन व्हावे, जेणेकरून पुन्हा असे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.

🔹 शासकीय रुग्णालयासह सर्व सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.

या निवेदनाद्वारे संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर महिलांना सुरक्षित वातावरण मिळाले नाही आणि दोषीवर कडक कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.