– खाकीतील माणुसकी: अंत्यविधी आटोपण्याची वाट पाहिली अन् मगच ठोकल्या बेड्या
हंसराज,भंडारा :- नागपूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘गुरूनानक ज्वेलर्स’च्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करून मागील ७ वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. चंद्रकुमार आसंदास सोनी (वय ५५, रा. तुमसर, जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेचा विषय ठरत आहे.
आरोपी चंद्रकुमार सोनी आणि मदनमोहन आसंदास सोनी (रा. नागपूर) यांच्याविरुद्ध २०१९ मध्ये १७,०१,४६०/- रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणातील दुसरा आरोपी मदनमोहन सोनी याला २०२० मध्येच अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी चंद्रकुमार सोनी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तो काही दिवस जयपूर (राजस्थान) येथे वास्तव्यास होता आणि पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता.
भंडारा पोलीस दलाला तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती मिळाली की, मुख्य आरोपी चंद्रकुमार सोनी हा भंडारा जिल्ह्यात लपून बसला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा अचूक शोध लावला.
ज्यावेळी पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा तिथे एका मृत्यूमुळे अंत्यविधीचे वातावरण होते. आरोपीच्या घरी धार्मिक विधी सुरू होते. अशा परिस्थितीत घरातील वातावरण आणि भावनांचा विचार करून पोलिसांनी अत्यंत संयम राखला. सर्व धार्मिक विधी आणि अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत पोलीस दबा धरून होते. विधी पूर्ण झाल्यानंतरच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, हेड कॉन्स्टेबल गीता शेंडे, शेषराव राठोड आणि रोहित अंबाडे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत.